रत्नागिरी (प्रतिनिधी):
रत्नागिरीतील प्रसिद्ध मत्स्यव्यवसायाचे केंद्र असलेल्या मिरकरवाडा परिसरात काल रात्री ११ च्या सुमारास आगीचे तांडव पाहायला मिळाले. ज्या ठिकाणी मासे साठवणूक केली जाते, सुकवले जातात आणि मासेमारीची साधने ठेवली जातात, अशा महत्त्वाच्या केंद्राला भीषण आग लागली. मात्र, जीवितहानी टळली असली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
रात्रीच्या शांततेत आगीचा भडका
काल रात्री जेव्हा संपूर्ण गाव निद्राधीन होण्याच्या तयारीत होते, तेव्हा अचानक मिरकरवाड्यातील मासळी साठवणूक केंद्रातून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. आगीची बातमी समजताच परिसरातील तरुणांनी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.
लोकप्रतिनिधी आणि तरुणांचा मदतीचा ‘धडाका’
नगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच पाणी सभापती निलेश नायर यांनी तातडीने धाव घेतली. त्यांच्यासोबत स्थानिक नगरसेवक सोहेल साखरकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी मदतीला धावून आली.
मदतीसाठी धावलेले ‘योद्धे’:
ताबिश साखरकर, हंजला साखरकर, समद मिरकर,मतीन मजगावकर, जाकीर, आसरा, सोहेल, नसीर, अब्दुल बहर आणि इतर अनेक कार्यकर्ते.
या सर्वांनी जीवाचे रान करून आग आटोक्यात आणण्यासाठी मेहनत घेतली. अग्निशामक दल येईपर्यंत या तरुणांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जे कष्ट घेतले, ते पाहून उपस्थित नागरिकांचे डोळे पाणावले.
सोहेल साखरकर यांच्या कार्याची ‘रेकॉर्ड ब्रेक’ चर्चा
या संपूर्ण मदतकार्यात नगरसेवक सोहेल साखरकर यांनी ज्या पद्धतीने पुढाकार घेतला, त्याचे विशेष कौतुक होत आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, आगीच्या ज्वाळांसमोर उभे राहून त्यांनी केलेले परिश्रम हे खरोखरच कौतुकास्पद होते. स्थानिक नागरिकांच्या मते, सोहेल साखरकर आणि त्यांच्या टीमने घेतलेली मेहनत ही रेकॉर्ड ब्रेक होती. त्यांच्या या धाडसामुळेच आगीचा प्रसार थांबला आणि मोठी हानी टळली.
आर्थिक फटका बसला, पण माणुसकी जिंकली
या आगीत मासेमारीची साधने आणि साठवलेल्या मासळीचे मोठे नुकसान झाले असून मच्छिमारांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. संकटसमयी राजकारण बाजूला ठेवून धावून आलेल्या लोकप्रतिनिधींमुळे आणि तरुणांच्या एकजुटीमुळे मिरकरवाडा पुन्हा एकदा सावरण्यासाठी सज्ज झाला आहे.
मिरकरवाड्यात भीषण आग! तरुण आणि लोकप्रतिनिधींच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला; सोहेल साखरकर यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
Leave a Comment
