रत्नागिरी (प्रतिनिधी):
रत्नागिरी येथील एम. एस. नाईक इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये गुरुवार, दि. २५ जून रोजी ‘हिफ्ज सूरह व कुरआन पठण स्पर्धे’चे अतिशय उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात आयोजन करण्यात आले. या आध्यात्मिक सोहळ्यात सुमारे ६० विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता सहावीचा विद्यार्थी हस्सान सिद्दीकी याने ‘सूरह अल-कद्र’च्या पवित्र पठणाने केली, तर अदीब सोलकर याने त्याचे इंग्रजी भाषांतर सादर केले. त्यानंतर इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ‘हम्द’ने वातावरणात भक्तिमय चैतन्य निर्माण केले. इयत्ता आठवीची विद्यार्थिनी अजमीन अजीम हिने आपल्या मधुर आवाजात ‘नात-ए-रसूल ﷺ’ सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री. अशफाक मुश्ताक नाईक होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मकतब व मदरसा तसहीहुल कुरआनचे प्रमुख हाफिज व कारी अब्दुल कुद्दूस उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी हिफ्ज सूरह, कुरआन पठण, भाषणे, कविता सादरीकरण आणि तहतुल लफ्ज कविता वाचन अशा विविध उपक्रमांतून आपली तयारी व बुद्धिमत्ता सिद्ध केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या फातिमा अल्ताफ झारी आणि आफीन रिजवान कादरी यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्ण शैलीत केले.
प्रमुख पाहुणे हाफिज व कारी अब्दुल कुद्दूस यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना पवित्र कुरआनच्या शिकवणीशी घट्ट नाते जोडण्याचे आवाहन केले आणि शाळा व्यवस्थापनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनात इस्लामिक स्टडीज विभागाचे मौलाना मुहम्मद जकी कासमी, मौलाना उसामा हज्जो नदवी, हाफिज शब्बीर हज्जो आणि श्री. सिद्दीक बारगीर यांनी मोलाची भूमिका बजावली. शाळेचे अध्यक्ष श्री. नौमान नाईक यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. शेवटी मौलाना मुहम्मद जकी कासमी यांनी उपस्थितांचे आभार मानले, तर श्री. सिद्दीक बारगीर यांच्या भावपूर्ण दुआने कार्यक्रमाची सांगता झाली.

