रत्नागिरीच्या भव्य मध्यवर्ती बसस्थानकाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पाहणी!

Shabbir Vasta
2 Min Read

रत्नागिरी : परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज नवीन रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाला भेट देऊन विविध प्रवासी व कर्मचारी सुविधांची सविस्तर पाहणी केली. यावेळी त्यांनी बसस्थानकातील हिरकणी कक्ष, चालक-वाहक विश्रांतीगृह, स्वच्छतागृहे तसेच प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या विविध सुविधांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
     नवीन रत्नागिरी बसस्थानक हे आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून सुमारे १३,१२०.५८ चौ.मी. क्षेत्रफळावर उभारण्यात आले आहे. बसस्थानकात २० फलाटांची व्यवस्था, प्रशस्त प्रवासी सुविधा, व्यापारी आस्थापने, पार्किंग, स्वतंत्र प्रशासकीय कक्ष तसेच चालक-वाहकांसाठी सुसज्ज विश्रांतीगृह उपलब्ध करून देण्यात आले आहे. सुमारे २३.४२ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे रत्नागिरी शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळाले आहे.
     पाहणीदरम्यान श्री. सरनाईक यांनी बसस्थानक परिसरातील स्वच्छता, प्रवाशांसाठी करण्यात आलेल्या सुविधा आणि बांधकामाचा दर्जा याबाबत समाधान व्यक्त केले. काही किरकोळ बाबींवर अधिक लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. विशेषतः प्रवाशांची सोय, स्वच्छतेची सातत्याने देखभाल आणि कर्मचारी सुविधांचा अधिक प्रभावी वापर यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
     यावेळी बोलताना श्री. सरनाईक म्हणाले की, “रत्नागिरीसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात उभारण्यात आलेले हे बसस्थानक एसटी महामंडळाच्या आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे वाहतूक सेवेला निश्चितच नवे परिमाण मिळेल.”
      त्यांनी या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न करणारे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे विशेष कौतुक केले. “रत्नागिरीच्या विकासासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार केला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्याला आधुनिक आणि दर्जेदार बसस्थानकाची भेट मिळाली असून त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो,” असेही श्री. सरनाईक यांनी सांगितले.
      नवीन रत्नागिरी बसस्थानकामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून कोकणातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *