रत्नागिरी नगर परिषदेची सभा गाजली: कोकणनगरवरील कारवाईवरून केतन शेट्येंचा प्रशासनाला संतप्त सवाल!

Shabbir Vasta
2 Min Read

“फक्त कोकणनगरलाच टार्गेट का? शहरात इतरत्रही अतिक्रमण!”
   नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांचे १५ ऑगस्टपूर्वी कारवाईचे कडक आदेश.


रत्नागिरी:
रत्नागिरी नगर परिषदेच्या मंगळवारी पार पडलेल्या कौन्सिल सभेत शहरातील अनधिकृत गाळे आणि टपऱ्यांचा मुद्दा चांगलाच पेटला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आक्रमक नगरसेवक केतन शेट्ये यांनी प्रशासनाच्या धोरणावर तीव्र आक्षेप घेत, “फक्त कोकणनगरलाच टार्गेट का? कोकणनगरवरच बुलडोझर का?” असा थेट आणि सज्जड सवाल प्रशासनाला केला. कोकणनगरवासीयांवर होत असलेला हा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
      सभेत बोलताना केतन शेट्ये म्हणाले की, साळवी स्टॉप, मारुती मंदिर, माळनाका आणि जयस्तंभ यांसारख्या शहरातील इतर प्रमुख ठिकाणांवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत टपऱ्या व गाळे उभे आहेत. मात्र, प्रशासनाची कारवाई केवळ कोकणनगर परिसरापुरतीच मर्यादित ठेवण्यात आली आहे, हे चुकीचे आहे. प्रशासनाने दुजाभाव न करता संपूर्ण शहरात एकसमान न्याय दिला पाहिजे.
      पुढे बोलताना त्यांनी नगर परिषदेने ९ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीची आठवण करून दिली. त्या जाहिरातीमध्ये शहरातील सर्व अनधिकृत गाळे, टपऱ्या, तसेच दुकानांसमोरील वाढीव छप्परे व अतिक्रमणे तातडीने हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात या सूचनांनुसार शहरभर कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही, असे त्यांनी पुराव्यानिशी निदर्शनास आणून दिले. शहरातील सर्व भागांतील अतिक्रमणांवर कठोर आणि निष्पक्ष कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.


नगराध्यक्षांचे १५ ऑगस्टपूर्वी कारवाईचे आदेश
     या संपूर्ण चर्चेनंतर आणि नगरसेवकांच्या आक्रमक भूमिका बघता, नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांनी या प्रकरणी तातडीने पावले उचलत प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत. येत्या १५ ऑगस्टपूर्वी रत्नागिरी शहरातील सर्व अनधिकृत गाळे व टपऱ्यांवर कायदेशीर कारवाई पूर्ण करावी, असे आदेश त्यांनी दिले. तसेच, यासंदर्भातील ठरावही आजच्या सभेत अधिकृतपणे मंजूर करण्यात आला असून, यामुळे आगामी काळात शहरातील अतिक्रमणांवर मोठ्या कारवाईचा बडगा उगारला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *