रत्नागिरीत ‘कोकणनगर’ फिडरवर वारंवार वीज खंडित; नगरसेवकांनी दिला आंदोलनाचा इशारा, महावितरणला दिले निवेदन!

Shabbir Vasta
3 Min Read

रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी):
रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील कोकणनगर आणि परिसरातील वीज पुरवठा गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होत असल्यामुळे स्थानिक नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. शिरगाव उपकेंद्रातून येणाऱ्या कोकणनगर फिडरवरील वीज दिवसातून तब्बल ५ ते ६ वेळा जात असल्याने, कडक उन्हाचा सामना करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. या गंभीर समस्येबाबत प्रभाग क्र. ४ चे नगरसेवक श्री. केतन उमेश शेट्ये आणि नगरसेविका श्रीमती फौजिया तन्वीर मुजावर यांनी महावितरणच्या अतिरिक्त अभियंत्यांना लेखी निवेदन देऊन तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

दिवसातून ५ ते ६ वेळा वीज गायब; नागरिक हैराण
महावितरणला दिलेल्या निवेदनात लोकप्रतिनिधींनी म्हटले आहे की, प्रभाग ४ मधील चर्मालय, स्टेट बँक कॉलनी, म्युनिसिपल कॉलनी आणि कोकणनगर म्हाडा कॉलनी या मुख्य नागरी वस्त्यांमध्ये सकाळी ७ वाजल्यापासूनच वीज खंडित होण्याचे सत्र सुरू होते. अनेकदा प्रदीर्घ काळासाठी वीज गुल राहत असल्याने सध्याच्या वाढत्या उष्णतेमुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांचे या फिडरकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांमधून केला जात आहे.

शुक्रवारच्या नमाजच्या वेळी वीज घालवू नका; ४ ते ५ हजार मुस्लीम बांधवांची गैरसोय
निवेदनात एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे महावितरणचे लक्ष वेधण्यात आले आहे. दर शुक्रवारी दुपारच्या वेळी (नमाजच्या वेळेत) या भागात नियमितपणे वीज खंडित केली जाते. शुक्रवारी नमाज पठणासाठी परिसरातील तीन मशिदींमध्ये सुमारे ४,००० ते ४,५०० बांधव उपस्थित असतात. आधीच प्रचंड उष्णता आणि त्यात वीज नसल्यामुळे मशिदींमधील गर्दीला नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे दर शुक्रवारी दुपारी १२:३० ते २:१५ या वेळेत कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा खंडित करू नये किंवा कोणतेही तांत्रिक काम काढून वीज बंद ठेवून नये , अशी आग्रही मागणी महावितरणकडे करण्यात आली आहे.

नायाबनगर येथील ‘डीपी’ बॉक्स ठरतोय धोकादायक!
या समस्येसोबतच, नायाबनगर येथील इक्रा स्कूलजवळ असलेल्या वीज वितरणच्या ‘डीपी बॉक्स’ला (DP Box) दरवाजा नसल्याची गंभीर बाब नगरसेवकांनी समोर आणली आहे. या परिसरातून शाळकरी मुलांची मोठी ये-जा असते. उघड्या डीपी बॉक्समुळे लहान मुलांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असून, महावितरणने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी या डीपी बॉक्सला तात्काळ दरवाजा बसवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
महावितरणने या मागण्यांची दखल घेऊन आपल्या कारभारात सुधारणा करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *