रत्नागिरी:
रत्नागिरीच्या विकासगाथेतील एक ऐतिहासिक टप्पा म्हणून, रत्नागिरी नगरपालिकेच्या नव्या सुसज्ज इमारतीचे लोकार्पण १ मे ‘महाराष्ट्र दिनी’ होणार आहे. या महत्त्वपूर्ण सोहळ्याची तयारी प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अनेक दशकांपासून असलेल्या जुन्या इमारतीने रत्नागिरीच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींची अनेक दशके साक्ष दिली आहे. या वास्तूशी शहरातील ज्येष्ठ नागरिक, माजी लोकप्रतिनिधी आणि अनेक अधिकारी यांच्या अनेक आठवणी आणि जिव्हाळ्याचे संबंध जोडलेले आहेत. मात्र, वाढत्या शहराच्या गरजा आणि प्रशासकीय कामाचा वेग लक्षात घेता, नगरपालिकेचे कामकाज आता जुन्या इमारतीच्या मागील बाजूस उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक नव्या प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित झाले आहे.
विशेष बाब म्हणजे, आपली नगरपालिका स्थापनेच्या १५० व्या वर्षात प्रवेश करत असतानाच ही आधुनिक इमारत कार्यान्वित होत आहे, ही रत्नागिरीकरांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
या नव्या इमारतीमुळे रत्नागिरीकरांना अधिक जलद, सुसज्ज आणि पारदर्शक सेवा मिळतील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधांनी सज्ज असलेली ही वास्तू रत्नागिरीच्या पुढील प्रगतीचा केंद्रबिंदू ठरेल, अशी अपेक्षा शहरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
रत्नागिरीकरांचे स्वप्न साकार: रत्नागिरी नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे १ मे रोजी लोकार्पण
Leave a Comment
