प्रशासनाला जळजळीत सवाल: “रस्ता दुरुस्त करा, नाहीतर मी स्वखर्चाने करून दाखवतो!”नौसीन काझी

Shabbir Vasta
2 Min Read

रत्नागिरीतील प्रभाग ४ मधील रस्त्यांची दयनीय अवस्था; माजी युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी आक्रमक

रत्नागिरी:
शहरातील चर्मालय चौक ते क्रांतीनगर, कोकणनगर आणि कीर्तीनगर या भागांना जोडणाऱ्या प्रभाग क्रमांक ४ मधील रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. या गंभीर प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक जिल्हाध्यक्ष नौसीन काझी यांनी आक्रमक पवित्रा घेत रत्नागिरी नगरपालिकेला धारेवर धरले आहे. “जर प्रशासन हा रस्ता दुरुस्त करू शकत नसेल, तर मी स्वखर्चाने हे काम पूर्ण करीन,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता?
गेल्या अनेक महिन्यांपासून या मार्गावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडले असून ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे, हा मार्ग शहरातून विमानतळ, औद्योगिक क्षेत्र आणि ग्रामीण भागाकडे जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे वाहनचालकांना आणि प्रवाशांना मणकेदुखी तसेच तीव्र धक्क्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.


जीवघेणा प्रवास आणि अपघाताची भीती
या मार्गावरून शाळकरी मुले, नोकरदार वर्ग आणि वृद्ध नागरिकांची मोठी वर्दळ असते. रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांसाठीही हा मार्ग सोयीचा आहे, परंतु खड्ड्यांमुळे वेळेत पोहोचणे कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळी प्रकाशअभावी हे खड्डे ‘डेथ ट्रॅप’ (जीवघेणे सापळे) ठरत असल्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
प्रशासकीय यंत्रणेवर थेट निशाणा
नौसीन काझी यांनी नगरपालिकेत निवेदन सादर करताना प्रशासनाला खडे बोल सुनावले. ते म्हणाले,
     “प्रशासनाकडे सर्व यंत्रणा आणि निधी उपलब्ध असताना सर्वसामान्य जनतेला अशा नरकयातना का सहन कराव्या लागत आहेत? जर रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर मी स्वतः पुढाकार घेऊन हा रस्ता दुरुस्त करीन.” यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते एजाज इबजी देखील उपस्थित होते.

मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन
नौसीन काझी यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर नगरपालिका मुख्याधिकारी गारवे यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. संबंधित रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. आता या आश्वासनाची पूर्तता कधी होते, याकडे संपूर्ण प्रभाग ४ मधील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *