अंगणवाडीतील चिमुकल्यांचा ‘विद्यारंभ’ सोहळा उत्साहात; शिरगाव मयेकरवाडीत बक्षीस वितरण संपन्न

Shabbir Vasta
2 Min Read

रत्नागिरी (प्रतिनिधी) :
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प १, बीट कोतवडे १ अंतर्गत शिरगाव मयेकरवाडी येथील अंगणवाडी केंद्रामध्ये ‘विद्यारंभ’ प्रमाणपत्र वाटप आणि क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. अंगणवाडीतील पूर्व प्राथमिक शिक्षण पूर्ण करून इयत्ता पहिलीत प्रवेश करणाऱ्या बालकांसाठी शासनाने २०२६ पासून सुरू केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दात्यांच्या दातृत्वाचा गौरव
या कार्यक्रमाला मयेकरवाडीतील दानशूर व्यक्तिमत्व नीता नंदकुमार मयेकर (माई) यांची विशेष उपस्थिती होती. ज्या जागेत अंगणवाडी भरते, ती जागा देऊन समाजासमोर एक आदर्श ठेवल्याबद्दल त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच अंगणवाडीला सातत्याने मदतीचा हात देणारे ज्येष्ठ नागरिक सुभाष शिवराम मयेकर (नाना) आणि आडी गावचे माजी पोलीस जयवंत ठीक यांनी उपस्थित राहून मुलांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष
योगायोगाने महाराष्ट्र दिन असल्याने अंगणवाडीतील चिमुकल्यांनी ‘महाराष्ट्र गीत’ सादर केले. या गीतामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.
सेविकेचे मनोगत व आभार
अंगणवाडी सेविका ममता मनोहर गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “अंगणवाडीत आणि समाजात काम करताना मिळणारे प्रेम हीच खरी काम करण्याची ताकद देते.” उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पहिलीत जाणाऱ्या सर्व बालकांना विद्यारंभ प्रमाणपत्रे आणि क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाला अंगणवाडी मदतनीस सान्वी सुमित कांबळे, सर्व पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *