खेडच्या रोटरी स्कूलचा देशपातळीवर डंका; ‘आयएमयू सीईटी’ परीक्षेत मोहम्मद राजीवटे, अब्दुल हादी नाडकरचे उज्ज्वल यश!

Shabbir Vasta
2 Min Read

खेड (प्रतिनिधी):
भारतीय सागरी विद्यापीठातर्फे (IMU) दिनांक २४ मे २०२६ रोजी देशपातळीवर घेण्यात आलेल्या ‘आयएमयू सीईटी’ (IMU CET) प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये खेड येथील रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेचे विद्यार्थी मोहम्मद अर्श राजीवटे आणि अब्दुल हादी नाडकर यांनी या कठीण परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून रोटरी स्कूल आणि खेड परिसराचे नाव देशपातळीवर गौरविले आहे.
     व्यापारी नौदल (मर्चंट नेव्ही) आणि सागरी क्षेत्रात उत्तम करिअर घडवू इच्छिणाऱ्या देशभरातील तब्बल ७२,००० विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या अत्यंत चुरशीच्या आणि कठीण परीक्षेत रोटरीच्या या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांनी बाजी मारत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
      भारतीय सागरी विद्यापीठाद्वारे घेतली जाणारी ‘आयएमयू सीईटी’ ही मरीन इंजिनिअरिंग, नॉटिकल सायन्स, नेव्हल आर्किटेक्चर आणि इतर महत्त्वाच्या सागरी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत मानाची परीक्षा मानली जाते. या परीक्षेत यश मिळवून मोहम्मद अर्श राजीवटे आणि अब्दुल हादी नाडकर यांनी मर्चंट नेव्हीच्या दिशेने आपले पाऊल खंबीरपणे पुढे टाकले आहे.
     या दोन्ही विद्यार्थ्यांना रोटरी स्कूलच्या विज्ञान शाखेतील तज्ज्ञ प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या अभूतपूर्व यशामुळे रोटरी स्कूलमध्ये सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, रोटरी संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांनी मोहम्मद अर्श राजीवटे आणि अब्दुल हादी नाडकर यांचे विशेष कौतुक केले असून, त्यांना पुढील उज्ज्वल वाटचालीस व भावी करिअरसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *