रत्नागिरी:
रत्नागिरीच्या शैक्षणिक क्षेत्रात रॅगिंगसारखे घाणेरडे प्रकार यापुढे अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. असे प्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट रस्टीकेट (सस्पेंड) करण्याचे आदेश राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, या घटनेत रॅगिंग करणाऱ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून स्वतः पीडित विद्यार्थ्यांनीच दाखवलेला मोठेपणा सध्या जिल्हाभर कौतुकाचा विषय ठरत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
रत्नागिरीत शिक्षणासाठी अहिल्यानगर (अहमदनगर), जामखेड आणि राज्याच्या इतर भागांतून मुले येतात. मात्र, बाहेरून आलेल्या काही विद्यार्थ्यांनी स्थानिक विद्यार्थ्यांना रॅगिंगचा त्रास दिल्याची गंभीर घटना समोर आली होती. वर्गात बसू न देणे आणि व्हॉट्सॲपवर चुकीचे मेसेज करणे अशा तक्रारी पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या होत्या. याची गंभीर दखल घेत काल शासकीय विश्रामगृहात एक विशेष बैठक पार पडली.
प्रशासनाची मोठी उपस्थिती
या बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी, प्रांत जीवन देसाई आणि संबंधित कॉलेजचे प्राचार्य उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी स्वतः विद्यार्थ्यांचे व्हॉट्सॲप चॅटिंग तपासून घटनेचे गांभीर्य ओळखले आणि रॅगिंग करणाऱ्या मुलांना एक वर्ष परीक्षेला बसू देऊ नका, असे कडक आदेश तत्काळ दिले.
शिक्षा झाली असती, पण… रत्नागिरीकरांचा ‘मोठेपणा’!
ज्या मुलांवर रॅगिंगचा अन्याय झाला, त्याच मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी एक अजब पण कौतुकास्पद मागणी पालकमंत्र्यांकडे केली. “आमच्यावर अन्याय झाला असला तरी, समोरच्या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, त्यांना एक वेळ माफ करा,” अशी विनंती या स्थानिक विद्यार्थ्यांनी केली. पीडित मुलांच्या या ‘उदात्तीकरणामुळे’ रॅगिंग करणाऱ्या मुलांचे वर्ष वाचले. मात्र, हा इशारा पहिला आणि शेवटचा असेल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सामंत यांची माणुसकी आणि सज्जड दम
या बैठकीसाठी लांबून आलेल्या पालकांची गैरसोय होऊ नये, म्हणून नामदार उदय सामंत यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या रात्रीच्या जेवणाची सोय शासकीय विश्रामगृहात केली. मात्र, सोबतच सज्जड दमही दिला की:
“बाहेरून येणाऱ्या प्रत्येक मुलाला रत्नागिरीत शिक्षणाच्या उत्तम सोयी दिल्या जातील, पण जर कोणी इथल्या वातावरणात रॅगिंगसारखी घाण पसरवेल, तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही नाहक त्रास दिला गेल्यास त्याचे रूपांतर थेट रस्टीकेट होण्यात होईल.”
या घटनेमुळे रत्नागिरीत आता रॅगिंग विरोधात कडक पाऊले उचलली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
