रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर कोरले यशाचे नाव
रत्नागिरी :
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने आयोजित अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत’ रत्नागिरीतील एम. एस. नाईक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले असताना, नाईक विद्यालयाच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाची मोहोर उमटवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
२९ एप्रिल रोजी ऑनलाईन स्वरूपात पार पडलेल्या या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये विद्यालयाने राज्यस्तरापासून तालुकास्तरापर्यंत सर्वच टप्प्यांवर बाजी मारली आहे.
यशस्वी रत्ने खालीलप्रमाणे:
राज्यस्तर : कु. लिबा मुकादम आणि कु. राझिया मुकादम यांनी तृतीय क्रमांक पटकावून राज्याच्या गुणवत्तेत स्थान मिळवले.
जिल्हास्तर : कु. नईम वस्ता (प्रथम), कु. सुवैबा बक्षी (द्वितीय) आणि कु. अकिद मुल्ला (तृतीय) यांनी जिल्ह्याचे नेतृत्व केले.
तालुकास्तर : कु. जोब्या आंबेडकर (प्रथम), कु. मो. जुबेर मुल्ला (द्वितीय), तर कु. रोझमीन बुड्ये व कु. अफान मजगावकर यांनी तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.
सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव:
विद्यार्थ्यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थाप्रमुख मा. श्री. नोमान नाईक, सीईओ मा. श्री. अकिफ काझी, मुख्याध्यापक मा. श्री. अशफाक नाईक, पर्यवेक्षक मा. श्री. मनोज चवेकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. श्रीम. आरिफा म्हालदार आणि कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षिका श्रीम. शेहजीन फणसोपकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
या यशामुळे एम. एस. नाईक विद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत असून, विद्यार्थ्यांच्या या यशाने रत्नागिरीच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
