प्रामाणिकपणाचे दर्शन; सुमारे ३ लाखांचे हरवलेले ब्रेसलेट काही तासांत परत

Shabbir Vasta
1 Min Read

राजापूर
आजच्या काळात हरवलेली वस्तू परत मिळणे दुर्मिळ मानले जाते. मात्र राजापूर तालुक्यात प्रामाणिकपणाचे प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे. तळवडे-वखाडवाडी (कर्जवने) येथील प्रकाश मनोहर गुरव यांचे अंदाजे ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट हरवले होते. काही तासांतच ते सुरक्षितपणे मालकाच्या हाती परत मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

प्रकाश गुरव हे ९ मे रोजी पाचल येथून लग्नासाठी भालवली राजापूरकडे निघाले होते. सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास राजापूर पेट्रोल पंप परिसरात त्यांच्या हातातील ब्रेसलेट हरवल्याचे लक्षात आले. शोधाशोध करूनही ते न सापडल्याने त्यांनी सायंकाळी ४.३० वाजता रायपाटण पोलीस दूरक्षेत्र येथे ठाणे अंमलदार कमलाकर पाटील यांच्याकडे तक्रार नोंदवली.

दरम्यान, सौंदळ परिसरात रिक्षा व्यवसाय करणारे आणि मांजरेवाडी सौंदळ येथील पोलीस पाटील अनिल हरिश्चंद्र माळी (वय ३९) यांना गोरुळेवाडी फाट्यानजीक हे ब्रेसलेट सापडले. त्याचवेळी ‘पोलीस पाटील रायपाटण बिट’ व्हॉट्सअ‍ॅप समूहावर हरवल्याचा संदेश पाहताच त्यांनी तत्काळ रायपाटण पोलीसांशी संपर्क साधून ब्रेसलेटबाबत माहिती दिली.

ठाणे अंमलदार कमलाकर पाटील यांनी तातडीने अनिल माळी यांना बोलावून ब्रेसलेट ताब्यात घेतले आणि संबंधित मालक प्रकाश गुरव यांच्या स्वाधीन केले. हरवलेले अंदाजे ३ लाखांचे ब्रेसलेट परत मिळाल्याने गुरव कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला.

या वेळी पोलीस कर्मचारी रामदास पाटील, स्वप्नील घाडगे, मनोज गुरव, दिनेश गुरव आदी उपस्थित होते. अनिल माळी यांच्या प्रामाणिकपणाचे पोलीस प्रशासनासह गुरव कुटुंबीयांनी कौतुक करून त्यांचा सन्मान केला.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *