रत्नागिरीतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रॅगिंग प्रकरण: जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांचा आक्रमक पवित्रा
रत्नागिरी:
रत्नागिरीतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकत्याच उघडकीस आलेल्या रॅगिंग प्रकरणाने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, दोषी विद्यार्थ्यांवर महाविद्यालयाने तातडीने अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
प्राचार्यांची घेतली भेट, दिले निवेदन
युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सुरेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महाविद्यालयाच्या प्राचार्यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला. यावेळी युवासेना शहरप्रमुख आशिष चव्हाण, नाचणे विभाग समन्वयक रितेश लोखंडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
काय आहे युवासेनेची भूमिका?
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रसाद सावंत म्हणाले की, “रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. आमची भूमिका या विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयातून काढून टाकण्याची नसली, तरी अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी ठोस अंतर्गत कारवाई होणे अनिवार्य आहे. पोलीस प्रशासनाकडून कारवाई होईलच, पण महाविद्यालय प्रशासन म्हणून तुमची जबाबदारी काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“जर महाविद्यालय प्रशासनाने दोषी विद्यार्थ्यांच्या चुकांवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला, तर युवासेना आपल्या स्टाईलने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराही सावंत यांनी यावेळी दिला.
दोन दिवसांत निर्णयाचे आश्वासन
या निवेदनानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. पाटील यांनी आपली बाजू मांडली. “सध्या रॅगिंग प्रतिबंधक समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले जात असून, पुढील दोन दिवसांत अहवाल प्राप्त होईल. त्या अहवालानुसार दोषींवर महाविद्यालय स्तरावर निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन प्राचार्यांनी युवासेनेला दिले आहे.
आता या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, महाविद्यालय प्रशासन नेमकी काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
रॅगिंग प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करा; अन्यथा युवासेना आपल्या ‘स्टाईल’ने धडा शिकवेल!
Leave a Comment
