कोकणनगरमध्ये ९८% रेशनकार्डधारकांना धान्य वाटप पूर्ण; नगरसेवक केतन शेट्ये व फौजिया मुजावर यांच्या पाठपुराव्याला यश

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी :
रत्नागिरीतील कोकणनगर परिसरातील रेशनधारकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुरवठा विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार, सप्टेंबर २०२६ अखेर नवीन रेशन दुकानामार्फत परिसरातील ७०० पैकी तब्बल ६९४ रेशनकार्डधारकांना धान्याचे यशस्वी वाटप करण्यात आले आहे. या यशस्वी वाटपामुळे तब्बल ९८ टक्के नागरिकांपर्यंत हक्काचे धान्य पोहोचले असून स्थानिक रहिवाशांमधून तीव्र समाधान व्यक्त केले जात आहे.
यापूर्वी कोकणनगर येथील नागरिकांना रेशन दुकानातून धान्य घेताना अनेक तांत्रिक व प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत होता. काही नागरिकांना नियमानुसार पूर्ण धान्य मिळत नसल्याच्या तक्रारीही सातत्याने समोर येत होत्या. सर्वसामान्यांची ही अडचण लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक श्री. केतन उमेश शेट्ये व नगरसेविका सौ. फौजिया तन्वीर मुजावर यांनी पुरवठा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी नवीन रेशन दुकानदाराची व्यवस्था करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला.
या पाठपुराव्यामुळे नवीन रेशन दुकानदार सचिन सुर्वे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांच्या माध्यमातून धान्य वाटपाची संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरळीत पार पडल्याचे पुरवठा अहवालातून स्पष्ट झाले आहे. नगरसेवकांच्या तत्परतेमुळे आणि प्रभावी पाठपुराव्यामुळे कोकणनगरमधील रेशनधारकांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांनी दोन्ही लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार मानले आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *