रत्नागिरी: रेल्वे बोर्डाने प्रवाशांच्या मागणीचा विचार करत, नागपूर ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या ‘टूरिस्ट स्पेशल’ गाडीचे नियमितीकरण करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता ही गाडी ११२०३/११२०४ नागपूर-मडगाव एक्सप्रेस या नावाने धावणार आहे. यामुळे कोकण आणि विदर्भाला जोडणारी ही रेल्वे सेवा आता अधिक स्थिर आणि नियोजित स्वरूपात प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.
काय बदलणार?
यापूर्वी ही गाडी ०११३९/०११४० या क्रमांकाने विशेष गाडी म्हणून धावत होती. आता तिला ‘नियमित एक्सप्रेस’चा दर्जा मिळाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार असून, नियमित प्रवासासाठी एक खात्रीशीर पर्याय उपलब्ध झाला आहे.
वेळापत्रक आणि प्रवास:
नागपूर ते मडगाव (११२०३): दर बुधवारी आणि शनिवारी नागपूरवरून दुपारी ३:०५ वाजता सुटेल.
मडगाव ते नागपूर (११२०४): दर गुरुवारी आणि रविवारी मडगाववरून रात्री ८:०० वाजता सुटेल. परतीच्या प्रवासात ही गाडी सोमवारी आणि शुक्रवारी रात्री ९:३० वाजता नागपूरला पोहोचेल.
रोहा थांबा: रोहा येथे दोन्ही दिशांना थांबा देण्यात आला असून, नागपूरकडून येताना ६:४५/६:५० आणि मडगाववरून जाताना ५:१५/५:२० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.
प्रमुख थांबे:
या गाडीला वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी या प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. भुसावळ आणि पनवेल येथे पाणी भरण्याची सुविधा उपलब्ध असेल.
गाडीची रचना:
ही एक्सप्रेस २४ डब्यांची असणार असून, यामध्ये जनरल, स्लीपर आणि वातानुकूलित (AC) कोचचा समावेश करण्यात आला आहे.
रेल्वे बोर्डाने या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. विदर्भ आणि कोकण दरम्यानचा प्रवास सुकर करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
नागपूर-मडगाव विशेष गाडी आता ‘नियमित एक्सप्रेस’; कोकण-विदर्भवासीयांना मोठा दिलासा!
Leave a Comment
