हिंदू राष्ट्राला इस्लामीकरणाचे गालबोट लागू नये; पालकमंत्री राणे यांचे प्रतिपादन

Shabbir Vasta
2 Min Read

संजय राऊत आणि ठाकरे गटावरही साधला निशाणा

​ओरोस (सिंधुदुर्ग):

जगभरात सुरू असलेल्या इस्लामीकरणाच्या पार्श्वभूमीवर हिंदू समाजाने सतर्क आणि जागृत राहण्याची गरज असून, आपल्या हिंदू राष्ट्राला इस्लामीकरणाचे गालबोट लागता कामा नये, असे प्रतिपादन पालकमंत्री राणे यांनी ओरोस येथे माध्यमांशी बोलताना केले.

यावेळी बोलताना पालकमंत्री राणे यांनी जागतिक स्तरावरील घडामोडींचा संदर्भ देत सांगितले की, जगातील विविध देशांमध्ये इस्लाम प्रसाराचे आणि जबरदस्तीने धर्म स्वीकारायला लावण्याचे प्रकार घडत आहेत. आम्ही हिंदू-मुस्लिम असे राजकारण करत नसून, हिंदू समाजाला केवळ जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत.आपला देश एक हिंदू राष्ट्र आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये, याची काळजी संपूर्ण हिंदू समाजाने घेतली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

​बाळासाहेब ठाकरे फोटो प्रकरण आणि संजय राऊतांवर टीका

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना राणे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी दैवत असून त्यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. कोणताही कडवट शिवसैनिक अशी चूक मुद्दाम करणार नाही आणि संबंधित व्यक्तीने याप्रकरणी माफी देखील मागितली आहे.

पुढे टीका करताना राणे यांनी संजय राऊत आणि त्यांच्या पक्षावर निशाणा साधला.महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात हे लोक बाळासाहेबांच्या नावापुढे ‘हिंदुहृदयसम्राट’ लिहिण्यासही घाबरायचे, असा आरोप त्यांनी केला. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केल्याबद्दल संजय राऊत आणि त्यांच्या पक्षानेच ३६५ दिवस नाक रगडून माफी मागायला हवी. दुसऱ्यांवर बोट दाखवण्यापेक्षा बाळासाहेबांच्या विचारांविरुद्ध वागल्याबद्दल त्यांनी किती वेळा माफी मागायला हवी, यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही राणे यांनी यावेळी म्हटले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *