रत्नागिरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या संयुक्त प्रयत्नांतून व पाठपुराव्यातून रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी आणि जाकीमिऱ्या येथील पाईप जेट्टी बांधकामाची कामे आता प्रत्यक्ष मार्गी लागली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत (बंदरे व परिवहन) येणाऱ्या महाराष्ट्र सागरी मंडळाने (महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड) या दोन्ही कामांसाठी अधिकृत ई-निविदा प्रसिद्ध केली आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी मिळून सुमारे २३ कोटी १६ लाख रुपयांहून अधिक निधी खर्च होणार असून, स्थानिक मच्छीमारांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी आता पूर्णत्वास जाणार आहे.
निविदा प्रक्रियेचा तपशील
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागातील नोंदणीकृत व अनुभवी ठेकेदारांकडून ‘बी-१’ नमुन्यात या कामांसाठी ई-निविदा मागविण्यात आल्या आहेत. दोन्ही कामांसाठी पावसाळा कालावधी धरून २४ महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली आहे.
प्रकल्पांनुसार निधीचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
- काळबादेवी पाईप जेट्टी (ता. जि. रत्नागिरी): या कामाची अंदाजित निविदा किंमत १२ कोटी १ लाख ६२ हजार ५१४ रुपये इतकी आहे. यासाठी इसारा रक्कम ६ लाख १ हजार रुपये असून कोऱ्या निविदेची किंमत ३ हजार ५४० रुपये ठेवण्यात आली आहे.
- जाकीमिऱ्या पाईप जेट्टी (ता. जि. रत्नागिरी): या बांधकामाची अंदाजित निविदा किंमत ११ कोटी १५ लाख ३ हजार २०३ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
बंदर विकासाला मिळणार चालना
काळबादेवी आणि जाकीमिऱ्या या किनारी भागांतील मच्छीमारांकडून सुसज्ज जेट्टीची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रश्नाची तातडीने दखल घेत निधी मंजूर करून निविदा प्रक्रिया सुरू केली. या दोन्ही जेट्टींमुळे स्थानिक मच्छीमार बांधवांच्या नौका सुरक्षित उभ्या करण्याचा आणि मासे उतरवण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
