‘स्टार न्यूज़ कोकण’
संपादक : शब्बीर वस्ता
उपसंपादक : नजीरुद्दीन वस्ता
कधीही न भरून निघणारी हानी: एक लढवय्या नेता, हक्काचा आधार हरपला!
रत्नागिरी:
मच्छीमार समाजाचे खंबीर नेतृत्व आणि मच्छीमारांच्या हक्कासाठी आयुष्यभर अविरत लढा देणारे ज्येष्ठ मार्गदर्शक जनाब अब्दुल लतीफ म्हालदार साहेब यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मच्छीमार समाजाने आपला एक खरा हितचिंतक, निर्भीड आवाज आणि लढवय्या नेता गमावला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जनाब अब्दुल लतीफ म्हालदार यांनी मच्छीमार बांधवांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी नेहमीच आघाडीवर राहून काम केले. मच्छीमारांचा कोणताही प्रश्न असो, मग तो स्थानिक पातळीवरचा असो वा धोरणात्मक—तो सोडवण्यासाठी त्यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा केला. मुंबईच्या मंत्रालयापासून ते दिल्लीच्या केंद्रीय पातळीपर्यंत जाऊन मच्छीमारांचे न्याय्य हक्क पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी अखंड संघर्ष केला. सरकार कोणाचेही असो, आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी निःपक्षपातीपणे आणि ताकदीने भूमिका मांडणारे नेते म्हणून त्यांची विशेष ओळख होती.
समाजातील संकटसमयी धावून जाणे, पारंपरिक मच्छीमारांचे प्रश्न ऐरणीवर आणणे आणि प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय करवून घेणे यात त्यांचा नेहमीच मोलाचा वाटा राहिला. त्यांच्या या अतुलनीय योगदानामुळे मच्छीमार बांधवांच्या मनात त्यांच्याबद्दल अत्यंत आदर आणि आपुलकीची भावना होती.
त्यांच्या निधनामुळे मच्छीमार समाजाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आणि मच्छीमार प्रतिनिधींनी जनाब म्हालदार साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण समाज सहभागी आहे.
जनाब अब्दुल लतीफ म्हालदार यांचा दफनविधी (तदफीन) आज दुपारी १:०० वाजता जोहरच्या नमाजानंतर राजीवडा-आदमपूर येथील कब्रस्तानात करण्यात येणार आहे.

