चिपळूण / प्रतिनिधी :
कोकणच्या पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ, ज्येष्ठ बौद्ध धम्म अभ्यासक आणि आंबेडकरी विचारधारेचे निष्ठावंत शिलेदार *मा. प्रभाकरजी जाधव साहेब* आज ८३ वर्षे पूर्ण करून ८४ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या निमित्ताने सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
भगवान गौतम बुद्धांच्या तत्वांशी एकनिष्ठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना वाहिलेले त्यांचे जीवन हे तरुण पिढीसाठी आदर्शवत आहे. तत्वांशी तडजोड न करता, स्वैराचाराला थारा न देता, केवळ ध्येयनिष्ठेने जगणे म्हणजे काय, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जाधव साहेब होय.
संघर्षातून घडलेले नेतृत्व
मा. जाधव साहेबांनी आपल्या प्रदीर्घ सामाजिक जीवनात अनेक लढे दिले. असुर्डे गावचा प्रश्न असो, मार्गताम्हाणे रस्त्याचा संघर्ष असो किंवा खेड मधील लढा असो – प्रत्येक लढा त्यांनी निर्भयपणे, अभ्यासपूर्ण आणि नियोजनबद्ध पद्धतीने लढला. कोणत्याही आमिषाला बळी न पडता ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांच्या या लढ्यांनी अनेक कार्यकर्त्यांना संघर्षाची प्रेरणा दिली.
बौद्ध धम्म प्रसाराचे अग्रदूत
तरुण वयापासूनच त्यांनी बौद्ध धम्म तत्वज्ञानाच्या प्रसाराचे कार्य हाती घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित मूळ इंग्रजी ग्रंथ *’बुद्ध अँड हिज धम्म’* या ग्रंथावर त्यांनी महाराष्ट्रभर हजारो प्रबोधनपर व्याख्याने दिली आहेत. या ग्रंथाचे ज्येष्ठ अभ्यासक म्हणून त्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो. आजही ते या विषयावर तासन्तास अभ्यासपूर्ण विवेचन करतात.
सन २००० साली चार बौद्ध भंतेजींना आणून त्यांनी पहिली ऐतिहासिक बौद्ध धम्म परिषद यशस्वी केली. बौद्ध समाजातील अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा यांच्या निर्मूलनासाठी त्यांनी अविरत जनजागृती केली. आज चिपळूण तालुक्यातील बौद्ध समाजात जो सकारात्मक बदल दिसतो, त्याचे मोठे श्रेय जाधव साहेबांनाच जाते.
चिपळूणच्या जडणघडणीत मोलाचे योगदान
चिपळूण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भव्य पुतळा उभारण्याचे संपूर्ण श्रेय मा. जाधव साहेबांचे आहे. तसेच हत्तीमाळ येथे डॉ. बाबासाहेबांनी घेतलेल्या ऐतिहासिक खोतीविरोधी परिषदेच्या जागी स्मारक व्हावे म्हणून ते आजही निकराचा लढा देत आहेत.
बौद्धांसाठी स्वतंत्र बौद्ध कायदा असावा या मागणीसाठी त्यांनी मा. थूल साहेबांच्या अध्यक्षतेखाली चिपळूणमध्ये भव्य सभा घेऊन विवाहविषयक समस्यांसह अनेक प्रश्नांना वाचा फोडली.
अॅड. बी. सी. कांबळे यांच्या नेतृत्वावर निष्ठा ठेवत त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे काम केले आणि पुढे सर्व गटांचे ऐक्य झाल्यावर ते एकीकृत रि.पा.इ. मध्ये सक्रिय झाले.
सहचारिणीची मोलाची साथ
या प्रदीर्घ वाटचालीत त्यांच्या सुविद्य सहचारिणी *सौ. मनिषाताई जाधव* यांनी त्यांना मोलाची साथ दिली.
मा. जाधव साहेबांच्या सान्निध्यात येणारा प्रत्येक व्यक्ती विचारांनी समृद्ध होतो. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याला आणि वाढदिवसाला *संदेश स. सावंत, एजाज इब्जी, भीमसैनिक आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांनी* मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांना दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!
८४ व्या वर्षात पदार्पण : तत्वनिष्ठ चळवळीचे प्रेरणास्थान मा. प्रभाकरजी जाधव साहेबांना वाढदिवसाच्या मंगलकामना
Leave a Comment
