४८३ विद्यार्थ्यांचा सहभाग : डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिनव उपक्रम
रत्नागिरी,(प्रतिनिधी) :
‘वाचाल तर वाचाल’ या सुविचाराचा प्रत्यय देत, शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ आणि ‘वाचन उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेच्या प्रांगणात सुमारे १००० हून अधिक पुस्तकांचे एकाच वेळी मौन वाचन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि संस्कारक्षम पिढी घडावी, या उद्देशाने या वाचन उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील एकूण ४८३ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान दोन गोष्टींची पुस्तके, संस्कार कथा आणि थोर व्यक्तींच्या चरित्रांचे वाचन केले. शाळेच्या प्रांगणात विशिष्ट पद्धतीची बैठक व्यवस्था करून विद्यार्थ्यांकडून हे शिस्तबद्ध व संस्कारक्षम वाचन करून घेण्यात आले. वाचनानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपण वाचलेल्या पुस्तकाचा सारांश आणि स्वतःचे अनुभवही मनमोकळेपणाने मांडले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. “वाचन हे मनाचे अन्न असून, उत्तम वाचनामुळेच माणूस वैचारिकदृष्ट्या समृद्ध होतो,” असा संदेश यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला. याच दिवशी असलेल्या ‘जागतिक हात धुवा दिना’चे औचित्य साधून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत हात धुण्याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.
या अभिनव उपक्रमाचे मुख्याध्यापक श्री. भगवान मोटे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मिलिंद संसारे यांनी विशेष कौतुक करून शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

