राजापूर (प्रतिनिधी):
राजापूर तालुक्यातील नानार-इंगळवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेला चार दिवस लोटले आहेत. या दुर्घटनेतील तीन मुलांचे मृतदेह हाती आले असून, बेपत्ता असलेल्या माहीरा भाटकर या चिमुकलीचा शोध घेण्यासाठी सलग चौथ्या दिवशीही प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक नागरिक शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
वागोठण खाडी व आंबेरी पूल परिसरात ही व्यापक शोधमोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत रत्नागिरी जिल्हा पोलीस, रत्नागिरी सागरी पोलीस, इंडियन कोस्टगार्ड, कमांडोज आणि हेलिकॉप्टरच्या साहाय्याने हवेतून व पाण्यातून सातत्याने पाहणी केली जात आहे.
स्थानिक मच्छिमारांचे कामधंदे बंद ठेवून सहकार्य
या परिसरातील मच्छिमारांचे रोजचे उपजीविकेचे साधन मासेमारी हेच असतानाही, गेल्या चार दिवसांपासून त्यांनी आपला व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवला आहे. खाडीकाठचे ग्रामस्थ आणि स्थानिक बुडुकर (तणणारे) कोणत्याही ऑक्सिजन सिलिंडर किंवा आधुनिक साधनांशिवाय पाण्यात २ ते ३ मिनिटे उड्या मारून चिमुकलीचा शोध घेत आहेत. आंबेरी पुलावर शेकडो नागरिक उपाशीपोटी आणि अहोरात्र थांबून या शोधमोहिमेवर लक्ष ठेवून आहेत.
स्कूबा डायव्हर्सची (Scuba Divers) नितांत गरज
राजापूर व देवगड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या या खाडीत पाण्याचा अंदाज येणे कठीण होत आहे. स्थानिक बुडुकर तणणाऱ्यांकडे आवश्यक ती साधने नसल्यामुळे खोल पाण्यात शोध घेणे आव्हानात्मक बनले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असून येथे स्कूबा डायव्हिंग केले जाते. त्यामुळे या मोहिमेसाठी विशेष प्रशिक्षित स्कूबा डायव्हर्स तातडीने उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी आग्रही मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
तसेच, घटनास्थळी दिवस-रात्र थांबलेल्या नागरिकांसाठी व शोधकार्यातील पथकांसाठी स्थानिक लोक अन्नाची व गरजेच्या वस्तूंची सोय करत आहेत. माहीराचा लवकरात लवकर शोध लागावा, याच एका आशेवर संपूर्ण परिसर एकवटला आहे.
