माणुसकी अन् धाडसाचा आदर्श! विहिरीतील मृतदेह काढण्यासाठी मजगावच्या तरुणांची धडपड; सर्वत्र कौतुक

Shabbir Vasta
1 Min Read

चिपळूण (प्रतिनिधी) :
दांडेआडम येथील एका विहिरीत मृतदेह आढळून आल्याची घटना घडल्यानंतर, स्वतःच्या जीवाची परवा न करता अत्यंत तत्परतेने शासकीय यंत्रणेला मदत करणाऱ्या मजगाव येथील तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दांडेआडमचे माजी सरपंच कैलास तांबे यांना विहिरीत एक शव असल्याची माहिती मिळताच त्यांनी रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ता नौसीन काझी यांच्याशी संपर्क साधून विहिरीत उतरून मदत करू शकणाऱ्या व्यक्तीबाबत चौकशी केली. नौसीन काझी यांनी तातडीने मजगाव येथील हरीश पोमेटकर यांचा नंबर दिला. दोघांमध्ये संपर्क होईपर्यंत पोलीस प्रशासनाचे पथकही घटनेच्या ठिकाणी पोहोचले होते.
घटनेचे गांभीर्य ओळखून मजगाव येथील हरीश पोमेटकर आणि गफूर काझी यांनी कसलाही विलंब न लावता दोरीच्या साहाय्याने थेट विहिरीत प्रवेश केला व अत्यंत शिताफीने तो मृतदेह बाहेर काढला. या संपूर्ण मोहिमेत झियान मुकादम यानेही त्यांना मोलाची साथ दिली.
आपल्या जीवाची पर्वा न करता शासकीय यंत्रणेला व पोलिसांना तत्काळ मदत करणाऱ्या मजगावच्या या तिन्ही तरुणांचे पोलीस प्रशासन तसेच दांडेआडम येथील ग्रामस्थांनी विशेष आभार मानले. हे तिन्ही तरुण केवळ अशा प्रसंगातच नव्हे, तर विहिरीत पडलेल्या जनावरांना सुरक्षित बाहेर काढणे आणि पकडलेले सर्प सुरक्षित जंगलात सोडण्याचे निःशुल्क कार्य नेहमीच करत असतात. त्यांच्या या निस्वार्थ आणि सामाजिक बांधिलकीच्या कार्याबद्दल संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *