रत्नागिरी:
रत्नागिरी शहराच्या सांस्कृतिक वैभवात लवकरच एक सुवर्ण अध्याय जोडला जाणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून माळनाका येथील स्कायवॉकचे एका भव्य आणि सुसज्ज ‘आर्ट गॅलरी’मध्ये रूपांतर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारची स्कायवॉक आर्ट गॅलरी उभारणारा रत्नागिरी प्रकल्प हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम ठरणार असून कलाप्रेमींसाठी हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.
साधारण १५० फूट लांबीच्या या अत्यंत भव्य आर्ट गॅलरीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या गॅलरीमध्ये महाराष्ट्रातील नामांकित चित्रकार, शिल्पकार आणि विविध कलाक्षेत्रांतील दिग्गज कलाकारांच्या सर्वोत्कृष्ट कलाकृती कायमस्वरूपी प्रदर्शित केल्या जातील. यामुळे रत्नागिरीकर नागरिक तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना एकाच छताखाली उच्च दर्जाच्या कलाकृतींचे दर्शन घडणार आहे.
उदयोन्मुख कलाकारांसाठी विशेष दालन
केवळ प्रथितयश कलाकारच नव्हे, तर नवनवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या तरुण व उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्यावरही यात भर देण्यात आला आहे. यासाठी आर्ट गॅलरीमध्ये एक ‘स्वतंत्र विशेष दालन’ राखीव ठेवण्यात येणार आहे. या माध्यमातून स्थानिक आणि नवोदित कलाकारांना आपली कला राज्य व देशपातळीवर मांडण्यासाठी एक हक्काचे आणि भव्य व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
या अभिनव प्रकल्पाचे काम सध्या वेगाने अंतिम टप्प्याकडे जात असून लवकरच ही आर्ट गॅलरी सर्व कलाप्रेमी आणि पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामुळे रत्नागिरीच्या पर्यटन आणि सांस्कृतिक नकाशावर एक नवे आकर्षण निर्माण होणार आहे.
रत्नागिरीत साकारणार राज्यातील पहिली ‘स्कायवॉक आर्ट गॅलरी’; पालकमंत्री उदय सामंत यांची संकल्पना
Leave a Comment
