जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत अजीजा दाऊद नाईक हायस्कूलचे दैदिप्यमान यश; १४ व १७ वर्षांखालील मुलांचे संघ विजेते

Shabbir Vasta
1 Min Read

‘स्टार न्यूज़ कोकण’
संपादक : शब्बीर वस्ता
उपसंपादक : नजीरुद्दीन वस्ता

रत्नागिरी, (दि. ४ ऑक्टोबर) :
रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय शासकीय बास्केटबॉल स्पर्धेत अजीजा दाऊद नाईक हायस्कूल, रत्नागिरीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली.

जिल्हा क्रीडा संकुल, रत्नागिरी येथे झालेल्या या स्पर्धेत प्रशालेच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने तसेच १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळविले. या दोन्ही विजयी संघांची वारणानगर, कोल्हापूर येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच प्रशालेच्या १४ वर्षांखालील मुलींच्या व १७ वर्षांखालील मुलींच्या संघांनी उपविजेतेपद संपादन करून प्रशालेच्या यशात भर घातली.

या स्पर्धेत सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ, शिस्त, आत्मविश्वास आणि जिद्दीचे दर्शन घडविले. खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खेळाडू,  त्यांचे मार्गदर्शक श्री. मैनुद्दीन भैरेवाडी व श्री. शाहनवाज राजापकर यांचे अध्यक्ष श्री. खलील नाईक, उपाध्यक्ष – श्री. नाझीर नाईक, श्री. मुनीर शेख आणि डॉ. अंबरीन नाईक, सोसायटीचे सर्व पदाधिकारी व व्यवस्थापन समिती सदस्य यांनी अभिनंदन केले.

प्रशालेचे मुख्याध्यापक समीर गडबडे, पर्यवेक्षिका रईसा मुजावर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनीही सर्व संघांचे कौतुक करून वारणानगर, कोल्हापूर येथे होणाऱ्या आगामी विभागीय स्पर्धेसाठी दोन्ही विजयी मुलांच्या संघांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

प्रशालेच्या या यशामुळे अजीजा दाऊद नाईक हायस्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *