विद्याव्रती शिक्षकाचा गौरवशाली प्रवास: अजमुद्दीन काझी सर यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ
रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्रमांक २, लोकमान्य टिळक विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. अजमुद्दीन काझी सर हे नियत वयोमानानुसार ३० सप्टेंबर २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या प्रदीर्घ, समर्पित व उल्लेखनीय शैक्षणिक सेवेनिमित्त त्यांचा सत्कार समारंभ बुधवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता लोकमान्य टिळक विद्यालयात मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.
या सत्कार समारंभास रत्नागिरी शहराच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे, उपनगराध्यक्ष श्री. समीर तिवरेकर, नगरसेविका सौ. मानसी करमरकर, नगरसेवक श्री. राजू तोडणकर, प्रशासन अधिकारी श्री. सुधाकर मुरकुटे, केंद्र समन्वयक, दामले विद्यालय, श्री. भगवान मोटे तसेच शहरातील सर्व मुख्याध्यापक व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शैक्षणिक सेवेला समर्पित प्रवास
श्री. अजमुद्दीन काझी सर यांनी आपल्या सेवेला 24 जुलै १९९१ मध्ये रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्रमांक ८ येथून सुरुवात केली. अभ्यासू वृत्ती, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि शिक्षणाबद्दलची निष्ठा यांच्या जोरावर त्यांनी शाळा क्रमांक ८ मध्ये गुणवत्ता सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे शाळेच्या विद्यार्थी पटसंख्येत लक्षणीय वाढ झाली.
त्यानंतर पदवीधर शिक्षक म्हणून त्यांची लोकमान्य टिळक विद्यालयात नियुक्ती झाली. येथे त्यांनी इंग्रजी व गणित या विषयांचे उत्कृष्ट मार्गदर्शन करत अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.
त्यानंतर त्यांची बदली शाळा क्रमांक २१, कोकणनगर येथे झाली. तेथेही विद्यार्थ्यांवर प्रेम, शिक्षणाप्रती निष्ठा आणि कर्तव्यभावना जपत त्यांनी अनेक गुणवंत व आदर्श विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले.
पुन्हा लोकमान्य टिळक विद्यालयात नियुक्ती झाल्यानंतर विद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे विद्यालयाच्या सुंदर व सुसज्ज इमारतीच्या उभारणीस मोठी मदत झाली.
त्यानंतर त्यांची बदली दामले विद्यालयात झाली. मात्र लोकमान्य टिळक विद्यालयाशी असलेले त्यांचे दीर्घकाळाचे नाते आणि अनुभव लक्षात घेऊन प्रशासनाने त्यांना पुन्हा लोकमान्य टिळक विद्यालयात सेवा करण्याची संधी दिली.
शैक्षणिक क्षेत्राबरोबरच कला व क्रीडा क्षेत्रातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
विविध पुरस्कारांनी सन्मान
शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक मान-सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये—
– नगरपरिषद आदर्श शिक्षक पुरस्कार
– लोकसेवा अकादमी, मुंबई यांचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार
– साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार
– नगर परिषद/महापालिका आदर्श शिक्षक पुरस्कार
– आविष्कार फाऊंडेशन, कोल्हापूर यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार
अखिल महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई राज्यातील राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार
संकेत कला अकादमी पुणे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
रत्नागिरी जिल्हा कुस्ती राज्य स्तरीय नेतृत्व
नगर परिषद आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नैपुण्य पदकं मिळवण्यासाठी मोलाचे योगदान
जिल्हा स्तरीय नवोपक्रम स्पर्धेत द्वितीय क्रमांक
जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला
शैक्षणिक कृती संशोधन राज्यस्तरीय निवड
साक्षरता अभियान प्लस पोलिओ मोहिमेत उत्कृष्ट योगदान
यांसह विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांवर प्रेम, सहकाऱ्यांशी आपुलकी, शिक्षणक्षेत्रातील निष्ठा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी या गुणांमुळे श्री. अजमुद्दीन काझी सर यांनी रत्नागिरीच्या शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे.
त्यांच्या प्रदीर्घ व गौरवशाली सेवेला सलाम करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभास बहुसंख्य शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक व हितचिंतकांनी उपस्थित राहून श्री. अजमुद्दीन काझी सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्याव्यात, ही नम्र विनंती.
संकलन – भगवान मोटे
मुख्याध्यापक दामले विद्यालय रत्नागिरी
ज्ञानसाधनेची ३५ वर्षे! अजमुद्दीन काझी सर यांचा सेवानिवृत्ती सत्कार व शुभेच्छा सोहळा
Leave a Comment
