रुग्णांच्या जीवाशी खेळाल तर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू; एकही डायलिसिस सेंटर बंद होऊ देणार नाही: आमदार किरण सामंत यांचा थेट इशारा

Shabbir Vasta
2 Min Read

गरज पडल्यास स्वतःच्या खिशातून टेक्निशियनचा पगार देणार; उद्याच केंद्र सुरू करण्याचा आक्रमक पवित्रा

लांजा :
लांजा-राजापूर तसेच रत्नागिरी-संगमेश्वर परिसरातील डायलिसिस रुग्णांच्या आरोग्याशी होणारा खेळ अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा संताप व्यक्त करत आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी प्रशासकीय यंत्रणा व संबंधित एजन्सीला थेट इशारा दिला आहे. “मतदारसंघातील एकही डायलिसिस सेंटर बंद पडू देणार नाही. तसा प्रयत्न झाल्यास उद्या स्वतः जाऊन सेंटर उघडू आणि रुग्णसेवा पूर्ववत करू,” असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.
     डायलिसिस हा किडनीच्या गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी जीवन-मरणाचा प्रश्न असतो. रुग्णांना दर आठवड्याला दोन ते तीन वेळा हे उपचार घ्यावे लागतात. अशा संवेदनशील परिस्थितीत केंद्र बंद झाल्यास ग्रामीण आणि दुर्गम भागातील गोरगरीब रुग्णांना वणवण भटकावे लागेल आणि त्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल, याकडे सामंत यांनी लक्ष वेधले.
संबंधित एजन्सीवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवणार
“सेंटर जाणीवपूर्वक बंद पाडून रुग्णांच्या जीविताशी खेळ केला, तर संबंधित अधिकारी व एजन्सीवर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडू,” असा थेट इशारा त्यांनी दिला. रुग्णांवर उपचारांअभावी कोणतीही वेळ ओढवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची असेल, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
स्वतःच्या खिशातून पगार देण्याची तयारी
कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून जर अडचण निर्माण करून केंद्र बंद करण्याचा घाट घातला जात असेल, तर ती मुजोरी चालू दिली जाणार नाही. “टेक्निशियनच्या पगाराची अडचण असेल, तर तो पगार मी स्वतःच्या खिशातून देईन; परंतु रुग्णांची जीवनवाहिनी असणारे सेंटर एक दिवसही बंद राहू देणार नाही,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
     लांजा, राजापूर, रत्नागिरी आणि संगमेश्वर परिसरातील कोणत्याही रुग्णाला वाऱ्यावर सोडणार नाही. प्रशासनाने तत्काळ कर्मचाऱ्यांचे वेतन व तांत्रिक अडचणी सोडवून सेवा अखंड सुरू ठेवावी, अन्यथा जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करू, असा इशाराही शेवटी आमदार किरण सामंत यांनी दिला.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *