लाडू-चकलीचा बहाणा की राजकीय भूकंपाची तयारी? संजय राऊत-प्रताप सरनाईक यांच्या गुप्त भेटीने खळबळ!

Shabbir Vasta
2 Min Read

शिवसेनेतील दुराव्यानंतर पहिल्यांदाच ‘मातोश्री’चे शिलेदार समोरासमोर; राऊत-सरनाईक भेटीने राजकीय भूकंप!

मुंबई
ऐन दिवाळीच्या सणात राजकीय वर्तुळात एका अनपेक्षित भेटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवसेना फुटीनंतर दोन्ही गटांत टोकाचा संघर्ष सुरू असताना, शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अचानक भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
     शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर ठाकरे आणि शिंदे गटात तीव्र राजकीय वाद पाहायला मिळत आहेत. निवडणुकांच्या प्रचारापासून ते दसरा मेळाव्यापर्यंत दोन्ही बाजूंच्या प्रमुख नेत्यांनी एकमेकांवर जोरदार हल्ले चढवले होते. अशा टोकाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उभय नेत्यांमध्ये झालेली ही भेट सुरुवातीला सर्वांनाच बुचकळ्यात पाडणारी ठरली.
     मात्र, या भेटीवर खासदार संजय राऊत यांनी स्वतः प्रतिक्रिया देत चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. “मी खाली आल्यावर प्रताप सरनाईक आल्याचे समजले. आमचे जुने व्यक्तिगत संबंध आहेत आणि त्यांच्या व माझ्या आईमध्ये अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे नाते आहे,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.
भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे सांगत राऊत पुढे म्हणाले, “दिवाळीचा सण असल्याने ते शुभेच्छा द्यायला आले होते. यामागे कोणतेही राजकीय संकेत नाहीत. ते आले, त्यांना आवडणारे लाडू-चकली खाल्ली आणि आईचा आशीर्वाद घेऊन गेले, त्यापलीकडे यात काही नाही.”
तसेच दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या शक्यतेवर बोलताना, “विलीनीकरणाबाबत काहीही चर्चा नाही; शिंदे गटात दोन शिंदे आहेत, ते तुम्हीच शोधा,” अशी सूचक टिप्पणीही त्यांनी जाता जाता केली.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *