‘सामंत बंधू’ आणि प्रमोद जठार यांच्यातील राजकीय समीकरणांवर जिल्ह्याचे लक्ष; जठारांकडून मात्र वादाचे खंडन
रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानपरिषदेवर नव्याने निवड झालेले भाजप आमदार प्रमोद जठार यांनी संपूर्ण जिल्ह्यात संपर्क आणि बैठकांचा धडाका सुरू केला असून, त्यांच्या या सक्रियतेमुळे महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेषतः जिल्ह्यात मजबूत पकड असलेल्या ‘सामंत बंधूं’च्या वर्चस्वाला या दौऱ्यांमुळे आव्हान दिले जात आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रत्नागिरी, लांजा-राजापूर आणि संगमेश्वर या पट्ट्यात पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांचे निर्विवाद प्राबल्य मानले जाते. अशा स्थितीत भाजप संघटना वाढवण्यासाठी प्रमोद जठार हे शासकीय बैठका, दुष्काळ आढावा बैठका तसेच स्थानिक गाठीभेटींवर भर देत आहेत. या वाढत्या हालचालींमुळे मित्रपक्षांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत.
“सरकार युतीत चालते, संघटना नाही” प्रमोद जठार
या सर्व राजकीय चर्चांवर आमदार प्रमोद जठार यांनी थेट भूमिका स्पष्ट केली आहे. “सशाच्या शिकारीला जाताना वाघाची तयारी करावी लागते, तशीच पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभेपर्यंत पूर्वतयारी असावी लागते. सरकार युतीमध्ये चालते, पण संघटना युतीत चालत नाही. संघटना बळकट करणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे,” असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले.
सामंत बंधूंशी असलेल्या संबंधांवर बोलताना ते म्हणाले, “उदय सामंत हे महायुतीमधील अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत. मी निवडून आल्यावर त्यांनीच मला सर्वप्रथम फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या. नुकतीच मी किरण सामंत यांचीही भेट घेतली असून आमच्यात कोणतेही मतभेद नसून पूर्ण मनोमिलन आहे.”
आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मोर्चेबांधणी
जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजप आपल्या संघटनात्मक ताकदीची चाचपणी करत आहे. दुसरीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर रस्सीखेच पाहायला मिळत आहे. प्रमोद जठार यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असला, तरी महायुतीतील अंतर्गत समतोल राखण्याचे मोठे आव्हान नेत्यांसमोर राहणार आहे.
