मुंबई-गोवा महामार्गावर अंजणारी पुलाजवळ मासळीचा ट्रक उलटला; चालक जखमी, लाखोंचे नुकसान

Shabbir Vasta
1 Min Read

लांजा :
मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलावर सोमवारी सकाळी ब्रेक फेल झाल्याने मासळी वाहतूक करणारा एक ट्रक पलटी झाला. या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून, ट्रकमधील मासळी रस्त्यावर पसरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
     मिळालेल्या माहितीनुसार, दापोली येथून गोव्याच्या दिशेने मासळी घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक एमएच ०८ डब्ल्यू ४६८६) सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरून जात होता. अंजणारी पुलाजवळ आल्यानंतर अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक महामार्गावरच उलटला. या अपघातात चालक सुदीप दुबे (वय २५, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. दापोली) हा किरकोळ जखमी झाला.
     अपघातामुळे ट्रकमधील सर्व मासळी महामार्गावर अस्ताव्यस्त पसरली, ज्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अपघातानंतर जखमी चालकाला तातडीने पाली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत केली.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *