‘स्टार न्यूज़ कोकण’
संपादक : शब्बीर वस्ता
उपसंपादक : नजीरुद्दीन वस्ता
रत्नागिरी: पी एम श्री, नगर परिषद शाळा क्र. १०, मिरकरवाडाच्या मुख्याध्यापिका रुखसाना आसिफ हुसेन बोरकर यांचा ३३ वर्षांच्या प्रदीर्घ आणि समर्पित शैक्षणिक सेवेनंतर भव्य निरोप समारंभ पार पडला. त्या ३० सप्टेंबर २०२६ रोजी सेवानिवृत्त झाल्या.
कार्यक्रमाची सुरुवात जामिआ अरेबिया रत्नागिरीचे इममा-ओ-खतीब हाफिज हंजला साहेब यांच्या पवित्र कुराण पठणाने (तिलावत) झाली. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत सुरेल आवाजात प्रार्थना, हम्द-नात आणि स्वागतगीत सादर केले.
या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी श्री. मुकुटे साहेब होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी रुखसाना मॅडम यांच्या कामाची अनोखी शैली, निष्ठा आणि साधेपणाचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमाला झालेली स्थानिक नागरिकांची प्रचंड गर्दी पाहून ते म्हणाले, “रुक्साना आपांचे प्रेम, आपुलकी आणि प्रामाणिकपणाचा हा जिवंत पुरावा आहे. मी आजपर्यंत कोणत्याही निरोप समारंभाला असा अलोट जनसागर पाहिला नव्हता.”
जमात-उल-मुस्लिमीन मिरकरवाडाचे माजी सचिव व विद्यमान सल्लागार सदस्य नझीरुद्दीन वस्ता यांनी जमातच्या वतीने रुखसाना मॅडम यांचा सत्कार करून त्यांच्या भावी निरोगी व आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आसिफ बोरकर, निसार दर्वे, सिराज खान सर आणि अब्दुल हमीद होडेकर आदी मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
आपल्या उत्तरार्ध भाषणात भावूक झालेल्या रुखसाना मॅडम यांनी आपल्या आई-वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. “माझ्या आई-वडिलांच्या प्रार्थनांमुळेच मी आयुष्याचा हा प्रदीर्घ प्रवास सुकर करू शकले. माझ्या भावांनी मला नेहमीच पाठिंबा दिला आणि माझ्या मुलांच्या संगोपनात विशेष लक्ष दिले. तसेच, सहकाऱ्यांच्या साथीशिवाय हा प्रवास शक्य नव्हता; त्यांनी माझ्या प्रत्येक चांगल्या-वाईट काळात खंबीरपणे साथ दिली,” असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास रत्नागिरी नगर परिषदेचे माजी उपसभापती शब्बीर वस्ता, नगरसेविका आफ्रीन होडेकर,मिरकरवाडा मच्छीमार सोसायटीचे सेक्रेटरी आसिफ कोतवडेकर, कर्ला ग्रामपंचायत सदस्य समीर भाटकर, माजी मुख्याध्यापक युसूफ गडकरी, माजी मुख्याध्यापिका फरीदा खान, इक्बाल खान, समाजसेविका फरजाना मस्तान यांच्यासह मिरकरवाडा,कर्ला व इतर परिसरातील अनेक नामांकित व्यक्तींनी विशेष उपस्थिती लावून रुखसाना मॅडम यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या शानदार कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन परवीन आपा, माहदा आपा आणि सबरीना आपा यांनी काव्यमय शैलीत केले. शेवटी अर्शिया आपा यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि आयोजकांचे उपस्थितांकडून विशेष कौतुक करण्यात आले.




