विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन; ‘बीएलओ’ घराघरांत जाऊन गोळा करणार कागदपत्रे
मुंबई:
महाराष्ट्रभर सध्या सुरू असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ बाबत भारत निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मतदार यादीत नाव नोंदणी करणे किंवा नावातील दुरुस्तीसाठी दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत आता १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो नवमतदारांना आणि नागरिकांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली.
३, ४, १० आणि ११ ऑक्टोबरला विशेष शिबिरे
नागरिकांची धावपळ होऊ नये आणि मोहिमेचा जास्तीत जास्त फायदा मिळावा यासाठी ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ या चार दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) स्वतः उपस्थित राहून नवीन मतदारांचे अर्ज भरणे, नावाची पडताळणी करणे आणि दुरुस्तीचे अर्ज स्वीकारणे ही कामे पूर्ण करून घेतील.
‘Unmapped’ व ‘Logical Discrepancy’ नोटिसांबाबत मोठा दिलासा
प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीनंतर ज्या मतदारांना Unmapped किंवा Logical Discrepancy च्या सुनावणीच्या नोटिसा मिळाल्या आहेत, त्यांना सरकारी कार्यालयात रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. BLO स्वतः अशा मतदारांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे गोळा करतील. तसेच नागरिक ही कागदपत्रे ऑनलाईन अथवा व्हॉट्सॲपवरूनही पाठवू शकतात. अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाईन सुनावणी घेतली जाईल, ज्यासाठी घरातील कोणतीही प्रौढ व्यक्ती उपस्थित राहू शकते.
१६ नोव्हेंबरला अंतिम प्रसिद्धी
या संपूर्ण विशेष पुनरीक्षण कार्यक्रमानंतर मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी केली जाणार आहे. लोकशाहीच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व पात्र नवमतदारांनी आणि नागरिकांनी या वाढीव मुदतीचा व विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
