‘SIR रद्द करा अन् निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्या!’; ‘विराट गर्जना मोर्च्या’त राज ठाकरेंचा घणाघात

Shabbir Vasta
2 Min Read

मुंबई:
महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर अवघ्या सहा महिन्यांत राज्यभरात तब्बल ४० ते ६० लाख मतदार कसे वाढले, असा सवाल उपस्थित करत मतदारयादीच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षणाला’ (SIR) विरोध दर्शवण्यासाठी मुंबईत भव्य ‘विराट गर्जना मोर्चा’ काढण्यात आला. शिवसेना ‘उबाठा’ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्च्याचे महापालिकेसमोर जाहीर सभेत रूपांतर झाले. या वेळी बोलताना राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि सत्ताधारी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
“२०१७ पासून सांगतोय मतचोरी सुरू आहे”
सभेला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले, “आजचा मोर्चा कशासाठी आहे हे सर्वांना माहिती आहे. मी २०१७-२०१८ पासून ओरडून सांगतोय की देशात मतचोरी सुरू आहे. त्या वेळी मी सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन ईव्हीएम (EVM) तसेच मतदारयाद्यांमधील घोळाबाबत सांगून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. त्या वेळी मी काय बोलत होतो, ते आता सर्वांना पटत आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) संपूर्णपणे रद्द झालाच पाहिजे आणि आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत.”
६० लाख मतदार वाढले कसे?
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर बोट ठेवत राज ठाकरे म्हणाले, “निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळूनही निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता; कुठेही जल्लोष नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या सहा महिन्यांत राज्यात ४० ते ६० लाख मतदार वाढले, हे कसे घडू शकते?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 
“उद्योगपतींचे भले आणि हुकूमशाही कारभार”
सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर ताशेरे ओढताना मनसे प्रमुख म्हणाले, “तुम्ही सत्तेत आहात याचा आम्हाला राग नाही, तर सत्ता ज्या पद्धतीने चालवली जात आहे त्याचा राग आहे. देशातील जंगले आणि बंदरे एकाच उद्योगपतीच्या घशात घातली जात आहेत. निवडणूक आयोग खिशात आहे म्हणून वाटेल ते करायचे, असा कारभार सुरू आहे. आज भाजप सत्तेत आहे म्हणून हे चालवून घेत आहात, पण उद्या दुसरा कोणताही पक्ष सत्तेत आला आणि त्यांनीही असाच मनमानी कारभार केला तर तुम्ही कुठे जाणार?” असा इशाराही त्यांनी दिला. 
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी या मोर्च्याच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या कामकाजाविरोधात जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *