रत्नागिरीच्या अफसान मिरकरची महाराष्ट्र १९ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी):
कै. छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीचा अष्टपैलू खेळाडू कु. अफसान मिरकर याची महाराष्ट्र राज्याच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात एकमताने निवड झाली आहे. मध्य प्रदेश येथे पार पडणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी राज्यस्तरीय निवड समितीने ही घोषणा केली.
      रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर पार पडलेल्या शालेय क्रिकेट स्पर्धा, गोगटे कॉलेजचे मैदान आणि वाटद खंडाळा येथील सामन्यांमध्ये अफसानने फलंदाजी व गोलंदाजीत नेत्रदीपक कामगिरी केली होती. या दमदार कामगिरीच्या जोरावर अंतिम निवड चाचणीसाठी राज्यभरातील गुणवान खेळाडूंमधून त्याची निवड करण्यात आली. रत्नागिरीच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अफसानने छत्रपती शिवाजी स्टेडियमवर झालेल्या अंतिम चाचणीत उत्तम खेळ दाखवून राज्य संघात आपले स्थान निश्चित केले.
     रत्नागिरी जिल्ह्याला आजवर १०० हून अधिक दर्जेदार खेळाडू देणाऱ्या कै. छोटू देसाई अकॅडमीच्या शिरपेचात अफसानच्या यशामुळे मानाचा तुरा रोवला गेला आहे. सरावातील सातत्य आणि कठोर परिश्रमांमुळेच त्याची यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्याच्या १६ वर्षांखालील व १९ वर्षांखालील संघातही निवड झाली होती, अशी माहिती अकॅडमीचे सचिव व प्रशिक्षक दीपक देसाई यांनी दिली. अफसानच्या सरावात रणजीपटू हरीष लाडे, महेंद्र सुर्वे, दिवाकर मयेकर आणि विनोद गावखडकर यांचे महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले.
     या निवडीबद्दल अकॅडमीचे अध्यक्ष गजेंद्रशेठ पाथरे, कार्याध्यक्ष रमेश कसबेकर व क्रीडाप्रेमींकडून अफसान मिरकरचे सर्वत्र कौतुक होत असून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *