इंग्लंडमध्ये रत्नागिरीच्या अविराज गावडेचा डंका; मिडलसेक्स काऊंटी क्रिकेट लीगमध्ये चमकदार अष्टपैलू कामगिरी

Shabbir Vasta
2 Min Read

१४१७ धावांसह ११७ विकेट्सची नोंद; दोन वर्षांत अविराजची कौतुकास्पद कामगिरी
रत्नागिरी :
इंग्लंडमधील प्रतिष्ठेच्या मिडलसेक्स काऊंटी क्रिकेट लीगमध्ये रत्नागिरीचे सुपुत्र अविराज अनिल गावडे यांनी सलग दोन हंगाम आपल्या अष्टपैलू खेळीने गाजवले आहेत. जलदगती गोलंदाजीसाठी अनुकूल मानल्या जाणाऱ्या इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर अविराजने आपल्या लेग स्पिनच्या जोरावर तब्बल ११७ विकेट्स पटकावल्या, तर फलंदाजीत १०३ च्या स्ट्राईक रेटने १४१७ धावा फटकावून दोन शतकेही नोंदवली. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे क्रीडा जगतातून त्याचे मोठे कौतुक होत आहे.
२०२५ च्या पदार्पणातच उमटवला ठसा
अविराजने २०२५ च्या हंगामात या लीगमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सत्रात त्याने २० सामन्यांमधील १९ डावांत ९८ च्या स्ट्राईक रेटने ५३६ धावा केल्या. यात नाबाद ११० धावांची मॅचविनिंग खेळी समाविष्ट होती. गोलंदाजीतही त्याने सातत्य राखत ४८ बळी टिपले. एका सामन्यात अवघ्या २७ धावांत ७ विकेट्स घेत त्याने संघाला एकहाती विजय मिळवून दिला होता.
२०२६ च्या मोसमात अधिक आक्रमक रूप
पहिल्या वर्षातील यश पुढे नेत अविराजने २०२६ च्या हंगामात फलंदाजी आणि गोलंदाजीत अधिक आक्रमक कामगिरी केली. या मोसमातील २२ सामन्यांत त्याने १०८ च्या स्ट्राईक रेटने तब्बल ८८१ धावा कुटल्या, ज्यामध्ये नाबाद ११६ धावांच्या एका शतकाचा समावेश आहे. याशिवाय गोलंदाजीतही त्याने कमाल दाखवत ६९ विकेट्स घेतल्या; यात ३० धावांत ६ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि दुहेरी यश
केवळ फलंदाजी आणि गोलंदाजीच नव्हे, तर क्षेत्ररक्षणातही अविराजची चुणूक पाहायला मिळाली. दोन वर्षांत त्याने २७ झेल टिपले असून ६ खेळाडूंना धावबाद केले. फिरकीला अजिबात साथ न देणाऱ्या इंग्लंडच्या मैदानांवर ३.६४ च्या सरासरीने ११७ बळी मिळवणे आणि सोबतच १४१७ धावा करणे, हे दुहेरी यश मिळवत अविराजने कोकणासह महाराष्ट्राचे नाव इंग्लंडच्या भूमीवर उज्ज्वल केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *