कोकणाचा अभिमान: झुल्फिकार परकार यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) १९ वर्षांखालील निवड समितीवर नियुक्ती

Shabbir Vasta
1 Min Read

कळंबस्ते (चिपळूण) :
चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते गाव, परिसरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण ठरला आहे. कोकणाचे सुपुत्र झुल्फिकार परकार यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) २०२६–२७ या क्रिकेट हंगामासाठी १९ वर्षांखालील (Under-19) निवड समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
     मुंबई क्रिकेटमधील त्यांचे प्रदीर्घ योगदान, दांडगा अनुभव आणि निष्ठेची दखल घेऊन एमसीएकडून ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेटमधील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’ (MCA) ही मुंबई क्रिकेटचे नियंत्रण करणारी सर्वोच्च संस्था आहे. एमसीएने विविध देशांतर्गत स्पर्धांमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूंचा शोध घेण्यासाठी आणि त्यांची निवड करण्यासाठी पाच सदस्यीय निवड समितीची घोषणा केली आहे. या समितीत झुल्फिकार परकार यांची निवड झाल्याने कोकणातील क्रीडा जगतातून त्यांचे जोरदार स्वागत होत आहे.
     ही निवड समिती केवळ खेळाडूंची निवड करणार नसून युवा खेळाडूंच्या प्रतिभेला पैलू पाडणे आणि गुणवान खेळाडूंना क्रिकेटच्या उच्च स्तरावर पोहोचण्यासाठी योग्य संधी उपलब्ध करून देणे, यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
झुल्फिकार परकार यांच्या या निवडीबद्दल चिपळूण, रत्नागिरी तसेच राज्यभरातील क्रीडाप्रेमी, क्रिकेट चाहते व मान्यवरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *