रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील स्वच्छतागृहाचे शुल्क रद्द करण्यासाठी हालचाली; प्रसाद सावंत यांचा प्रशासनाला इशारा

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी:
रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून स्वच्छतागृहाच्या वापरासाठी आकारले जाणारे ५ रुपयांचे शुल्क रद्द करून, ती सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याच्या मागणीला यश मिळताना दिसत आहे. युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी या संदर्भात केलेल्या तक्रारीची दखल घेत कोकण रेल्वे प्रशासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत.

१ एप्रिल २०२६ पासून रत्नागिरी स्थानकावरील स्वच्छतागृहाचा ठेका “चालवा व देखभाल करा” या तत्त्वावर देण्यात आला होता. या करारानुसार लघवीसाठी ५ रुपये शुल्क आकारण्याची तरतूद होती. मात्र, यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती.
यावर प्रसाद सावंत यांनी २९ मे रोजी रेल्वे प्रशासनाला पत्र देऊन या बेकायदेशीर शुल्क आकारणीबाबत तक्रार केली होती आणि हे शुल्क तातडीने बंद करण्याची मागणी केली होती.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे मंडल वाणिज्य प्रबंधक शैलेश डी. आंबेडकर यांनी प्रसाद सावंत यांना पत्र पाठवून माहिती दिली आहे की, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हे शुल्क रद्द करण्याचा प्रस्ताव उचित निर्णयासाठी बेलापूर येथील निगम कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना प्रसाद सावंत म्हणाले की, “मला २२ जून रोजी रेल्वे प्रशासनाकडून पत्र प्राप्त झाले आहे. आता बेलापूर येथील मुख्य कार्यालयाकडून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. मात्र, जर १५ दिवसांच्या आत यावर निर्णय झाला नाही, तर त्या स्वच्छतागृहामध्ये ठेकदाराचा माणूस दिसणार नाही,” असा आक्रमक इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *