पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढणार?

Shabbir Vasta
1 Min Read

कोकणातील मच्छिमारांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी थेट १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्याबाबत चर्चा झाली आहे.

सिंधुदुर्ग :
केंद्र शासनाच्या नियमांनुसार सध्या पश्चिम किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा एकसमान पावसाळी मासेमारी बंदी कालावधी लागू आहे. मात्र, कोकण किनारपट्टीवरील पावसाचा जोर आणि समुद्रातील प्रतिकूल हवामान लक्षात घेता, हा बंदी कालावधी १५ मे ते १५ ऑगस्ट असा वाढवण्याबाबत जिल्हा सल्लागार व सनियंत्रण समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.     जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
     या बैठकीत समिती सदस्यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्रात जर मासेमारी बंदीचा कालावधी वाढवायचा असेल, तर केवळ एका राज्यात नियम बदलून चालणार नाही. यासाठी गोवा आणि कर्नाटकसह संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवरील सर्व राज्यांमध्ये एकसमान नियम असणे आवश्यक असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले. शेजारील राज्यांमध्ये मासेमारी सुरू राहिल्यास स्थानिक मच्छिमारांवर अन्याय होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन हा सूर लावण्यात आला.
      पावसाळ्यात समुद्रातील वादळी हवामान आणि माशांचा प्रजननाचा काळ लक्षात घेऊन हा बंदी कालावधी निश्चित केला जातो. कालावधी वाढवल्यास माशांची पैदास वाढण्यास मदत होईल, मात्र शेजारील राज्यांच्या भूमिकेवरच पुढील निर्णय अवलंबून असेल.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *