मुंबई:
राज्यात चालू वर्षी मान्सूनच्या आगमनाबाबत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील १० दिवसांपासून मान्सूनची वाटचाल पूर्णपणे रखडली असून, मान्सून अरबी समुद्रातच रेंगाळला आहे. १८ जून उजाडला तरीही मान्सूनची कोणतीही प्रगती झालेली नाही. सुरुवातीला मान्सून १५ जूनपर्यंत राज्यात दाखल होईल असा अंदाज होता, जो नंतर २० जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आला. मात्र, अरबी समुद्रातील सध्याची संथ हालचाल पाहता २० जूनलाही पाऊस येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. यामुळे यंदाचा संपूर्ण जून महिना कोरडा जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
मुंबईसह संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी अजून किमान ८ दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. परिस्थिती अशीच राहिली तर थेट जुलै महिना उजाडण्याची शक्यता आहे.प्रशांत महासागरात ‘एल निनो’ सक्रिय झाला असून, यामुळे यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.पाऊस लांबल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्णपणे ठप्प झाल्या असून बळीराजा पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे.पाऊस नसल्यामुळे धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, भूजल पातळी खाली गेल्याने राज्यात मोठ्या पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाऊस गायब असला तरी राज्यात उष्णतेचा कडाका वाढणार आहे. आकाशात सकाळी काळे ढग जमा होत असले तरी दुपारच्या वेळी कडक ऊन पडत आहे. आज राज्यातील अनेक भागांत उष्णता वाढण्याची शक्यता असून रत्नागिरी,सिंधुदुर्ग,मुंबई, ठाणे
,पालघर जिल्ह्यांमध्ये उष्ण वातावरणाचा (Heat Warning) इशारा देण्यात आला आहे.
मान्सून लांबल्यामुळे आणि धरणांतील पाणी आटल्यामुळे राज्यासमोर गंभीर संकट उभे ठाकले आहे. पुढील काही दिवस जर अशीच परिस्थिती राहिली, तर पाणी आणि शेतीचा प्रश्न अत्यंत गंभीर रूप धारण करू शकतो.
