रत्नागिरी आणि संगमेश्वरला वादळाचा तडाखा; महावितरणचे मोठे नुकसान, अनेक भागांत वीजपुरवठा खंडित

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी:
रत्नागिरी शहरासह जिल्ह्याला आज सायंकाळी वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या वेगवान वाऱ्यामुळे शहराचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. सुमारे दीड तास शहर अंधारात होते, मात्र महावितरणने युद्धपातळीवर प्रयत्न करून सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरातील पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळवले.
    वादळाचा सर्वाधिक फटका संगमेश्वर तालुक्याला बसला आहे. येथे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वीज यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक भागांतील वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे.
संगमेश्वर उपकेंद्राला पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही निवळी आणि ३३ केव्ही आरवली या दोन्ही मुख्य वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने अंधार पसरला आहे.
     वादळाच्या तीव्रतेमुळे ठिकठिकाणी विजेचे खांब कोसळले असून वीजवाहिन्यांचे संचही तुटले आहेत.पाऊस आणि वाऱ्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत असतानाही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने शोधमोहीम राबवली. यामध्ये ‘आरवली वाहिनी’वरील तांत्रिक बिघाड शोधण्यात यश आले असून, त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.जिल्ह्यात इतरही अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली असून खबरदारी म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *