कोल्हापूर:
कोल्हापूरमध्ये पतीला भेटण्याच्या बहाण्याने डॉक्टर महिलेच्या घरात घुसून अत्याचार केल्याची आणि त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.
शहरात एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून, त्याचा व्हिडिओ बनवून एक लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पीडित महिला डॉक्टर घरात एकटीच असताना, तिच्या ओळखीचा शक्ती विक्रम भोसले(वय २८, रा. शाहूपूरी, कोल्हापूर) हा तिथे आला. त्याने महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, या घृणास्पद कृत्याचे त्याने आपल्या मोबाईलवर चित्रणही केले.
पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांचे तोंड दाबून धरले आणि आरडाओरडा केल्यास पतीसह त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. या धक्कादायक प्रसंगामुळे पीडित महिला प्रचंड मानसिक धक्क्याखाली होती. त्यानंतर १ मे रोजी रात्री आरोपीने तो व्हिडिओ महिलेच्या मोबाईलवर पाठवून, तो डिलीट करण्यासाठी एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
अखेर धीर एकवटून पीडितेने शनिवारी (२ मे) राजारामपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास चक्रे फिरवली आणि आरोपी शक्ती भोसले याला अटक केली. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेमुळे कोल्हापूर शहरात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
