रत्नागिरी:
रत्नागिरीतील अभ्यासू व्यक्तिमत्व आणि माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांच्या कार्याची आता आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानव वस्ती कार्यक्रम (UN-Habitat) कार्यकारी संचालकांच्या कार्यालयाकडून त्यांना अझरबैजान देशाच्या राजधानीत होणाऱ्या ‘जागतिक शहर विकास परिषद २०२६’ (World Urban Forum 2026) साठी अधिकृत आमंत्रण प्राप्त झाले आहे.
मिलिंद कीर यांनी शहराच्या भविष्यासाठी १८३० कोटींची तरतूद आणि व्हिजन प्लॅन मंजूर करून घेतला होता. त्यांच्या या दूरदृष्टीच्या नेतृत्वाच्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली असून, अशा प्रकारचा सन्मान मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील मोजक्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश झाला आहे.
सध्या इराणमधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अझरबैजानची राजधानी बाकू ही तेहरानपासून सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर आहे. सध्याचे अस्थिर वातावरण पाहता, प्रत्यक्ष उपस्थित राहणे टाळून ते या जागतिक परिषदेत ऑनलाइन माध्यमातून सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

