खासगी केंद्रात आता मोफत सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध
रत्नागिरी: शासकीय रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन बंद असल्याने सर्वसामान्य रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता, शिवसेना विभाग संघटक आणि मजगाव ग्रामपंचायतचे सरपंच/प्रशासक फैयाज मुकादम यांनी दाखवलेली तत्परता आणि पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांनी घेतलेल्या तत्काळ निर्णयामुळे गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता शासकीय रुग्णालयातील गरजूंना खासगी सेंटरमध्ये मोफत सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध झाली आहे.
नेमके प्रकरण काय?
फैयाज मुकादम एका जखमी रुग्णाला उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात घेऊन गेले होते. डॉक्टरांनी त्या रुग्णाला त्वरित सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला, परंतु रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संबंधित रुग्ण अत्यंत गरीब असल्याने खासगी डायग्नोस्टिक सेंटरचे महागडे दर त्यांना परवडणारे नव्हते. तरीही माणुसकीच्या नात्याने फैयाज मुकादम यांनी स्वतः पुढाकार घेत त्या रुग्णाचे खासगी केंद्रात सीटी स्कॅन करून घेतले.
सामंत बंधूंची तत्काळ दखल
केवळ एका रुग्णापुरता विचार न करता, भविष्यात अन्य गरीब रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी फैयाज मुकादम यांनी ही गंभीर बाब राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत आणि लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली. फैयाज मुकादम यांनी केलेल्या या मागणीची आणि रुग्णांच्या कठीण परिस्थितीची दखल घेत सामंत बंधूंनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.
रुग्णांसाठी नवीन सुविधा
या आदेशानुसार, आता शासकीय रुग्णालयातील अपघातग्रस्त किंवा गरजू रुग्णांना खासगी ‘प्राईम डायग्नोस्टिक सेंटर’मध्ये सीटी स्कॅन करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तपासणीचा सर्व खर्च आता शासकीय रुग्णालय प्रशासनाकडून केला जाणार आहे.
फैयाज मुकादम यांची जागरूकता आणि पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांनी दाखवलेली तत्परता यामुळे सामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांमधून या संवेदनशील निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे.
