रत्नागिरी नगर परिषद कर्मचाऱ्यांची अनोखी माणुसकी; आगग्रस्त घाणेकर कुटुंबाला ५० हजारांची मदत!

Shabbir Vasta
1 Min Read

रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी):
एकीकडे शासकीय कर्मचाऱ्यांबद्दल अनेक तक्रारी ऐकायला मिळत असतानाच, रत्नागिरी नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मात्र समाजासमोर माणुसकीचा एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. आंबेशेत येथील आगग्रस्त गरीब कुटुंबाला स्वतःच्या खिशातून तब्बल ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करत कर्मचाऱ्यांनी आपला ‘खारीचा वाटा’ उचलला आहे.
     चार दिवसांपूर्वी रत्नागिरीतील आंबेशेत रस्ता परिसरातील संजय घाणेकर यांच्या घराला भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत या गरीब कुटुंबाचे संपूर्ण घर डोळ्यादेखत भस्मसात झाले. संजय घाणेकर हे गवंडी काम करतात, तर त्यांची पत्नी मोलकरणीचे काम करून घराला हातभार लावते. अत्यंत कष्टाने कमावलेले आणि कर्मचाऱ्यांना देण्यासाठी घरात ठेवलेले पैसेही या आगीत जळून खाक झाल्याने घाणेकर कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले होते.
     घाणेकर कुटुंबावर ओढवलेले हे संकट पाहून रत्नागिरी नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संवेदनशीलतेने पुढे आले. सर्वांनी एकत्र येत आपल्या पगारातून निधी गोळा करण्यास सुरुवात केली आणि पाहता पाहता तब्बल ५०,००० रुपये जमा केले. नुकतीच ही ५० हजार रुपयांची रोकड नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते घाणेकर कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आली.
नगर परिषदेच्या या तत्परतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे घाणेकर कुटुंबाला या संकटसमयी मोठा आर्थिक व मानसिक आधार मिळाला असून, रत्नागिरीकरांकडून कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीचे जोरदार कौतुक होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *