साखरपा:
बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये आपल्या दमदार कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकणारी बिग बॉस विजेती तन्वी कोलते उद्या शुक्रवारी आपल्या साखरपा या मायभूमीत परतत आहे. तिच्या या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता साखरपा परिसरात एका भव्य स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
तन्वीच्या स्वागतासाठी चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून ही रॅली रत्नागिरी-नागपूर हायवेवरून सुरू होईल. त्यानंतर साखरप्याच्या मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण करत ही रॅली मार्गस्थ होईल. रॅलीदरम्यान ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात तन्वीचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. रॅलीची सांगता झाल्यानंतर नानासाहेब शेट्ये सभागृहात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तन्वी कोलते आपला बिग बॉस मधील प्रवास अनुभव आणि मिळालेले यश यावर मनोगत व्यक्त करेल. तसेच आपले कुटुंब,गावकरी आणि चाहत्यांशी ती थेट संवादही साधणार आहे. या सोहळ्याला चाहत्यांची आणि समर्थकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता त्यासाठी स्थानिक प्रशासनाने कंबर कसली आहे. रॅलीच्या मार्गावर पोलीसांची चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक विभागातर्फे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
बिग बॉस मराठी विजेती तन्वी कोलते साखरप्यात येणार; भव्य रॅलीचे आयोजन
Leave a Comment
