समुद्रातील मासेमारी बंद; खाडीच्या मासळीचे दर गगनाला, खवय्यांची चिकनकडे धाव!

Shabbir Vasta
2 Min Read

रत्नागिरी:
१ जूनपासून समुद्रातील मासेमारी अधिकृतपणे बंद झाल्यामुळे सध्या बाजारात खाडीच्या माशांना प्रचंड मागणी वाढली आहे. मात्र, पावसामुळे खाडीत अपेक्षित मासळी मिळत नसल्याने माशांचे दर कमालीचे वधारले आहेत. दर वाढल्यामुळे मासे खवय्यांची मोठी पंचाईत झाली असून, अनेकांनी आपला मोर्चा आता चिकन खरेदीकडे वळवला आहे. मात्र, तिथेही दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे.


खेकडे थेट ६०० पार; खाडीच्या मासळीचा ‘भाव’ वाढला!
रत्नागिरी शहराजवळील राजीवडा आणि मिरकरवाडा बंदरावर सध्या खाडीतील मासे खरेदी-विक्रीसाठी खवय्यांची गर्दी होत आहे. रविवारी (ता. ७) बाजारपेठेत आलेल्या ग्राहकांना वाढलेल्या दरांचा मोठा फटका बसला.
नेहमी २०० ते ३०० रुपयांना मिळणारा मोठा खेकडा थेट ६०० रुपये नग या दराने विकला जात आहे.
पावसाळ्यात विशेष पसंती असलेला ताऊज मासा २५० ते ३०० रुपये अर्धा किलो म्हणजेच ५०० ते ६०० रुपये किलो झाला आहे.
तिसरे (मुळे) पूर्वी १५० रुपये शेर मिळायचे, ते आता १०० रुपयांना एक वाटा (कमी प्रमाणात) विकले जात आहेत.
याशिवाय बोयरं, रेणवी, लेपी, सुळे, कांटा आणि खाडीची कोळंबी या मासळीचे दरही ५०० ते ६०० रुपये किलोवर पोहोचले आहेत.


मासे महागल्याने चिकनला मागणी; तिथेही २९० चा टप्पा!
माशांचे चढे दर पाहून अनेक खवय्यांनी चिकन खाण्याला पसंती दिली आहे. त्यामुळे सध्या कोकणात चिकन आणि मटणाची मागणी कमालीची वाढली आहे. पण, वाढत्या मागणीमुळे चिकनच्या दरातही वाढ झाली असून, सध्या चिकनचा दर प्रति किलो २८० ते २९० रुपये (काही ठिकाणी ३०० रुपये) वर पोहोचला आहे.
एकंदरीत, पावसाच्या तोंडावर समुद्रातील ताजी मासळी बंद झाल्याने आणि खाडीच्या माशांचे दर कडाडल्याने कोकणातील मासे खवय्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *