रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर परिसरातील अत्यंत प्रसिद्ध अशा ‘परकार रुग्णालयाच्या’ डायलिसिस विभागामध्ये सोमवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असून बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. सुरुवातीला आग छोटी असतानाच त्यावर वेळीच नियंत्रण न मिळवता आल्याने आगीचा भडका उडाला आणि डायलिसिस विभागात धुराचे प्रचंड लोट निर्माण झाले. या दाट धुरामुळे डायलिसिस विभागात उपचार घेत असलेले अनेक वृद्ध रुग्ण गुदमरल्याने अत्यंत भीतीचे व गंभीर वातावरण निर्माण झाले होते.
आग लागल्याचे समजताच संपूर्ण रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आणि रुग्णांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला. आगीची ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरताच, रुग्णांच्या काळजीत असलेल्या शेकडो नातेवाईकांनी तातडीने हॉस्पिटलच्या दिशेने धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान आणि अनेक ॲम्बुलन्स (रुग्णवाहिका) काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाल्या.
रुग्णालयातील कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने डायलिसिस विभागातील व इतर प्रभागांतील रुग्णांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. धुराचे साम्राज्य असतानाही जीवाची पर्वा न करता सर्व पेशंटला सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. बाहेर काढण्यात आलेल्या रुग्णांना तातडीने पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालये आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) यशस्वीरीत्या शिफ्ट करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम घेत आगीवर पूर्णपणे ताबा मिळवला असून, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
रत्नागिरीत खळबळ! शिवाजीनगरमधील प्रसिद्ध परकार हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागाला भीषण आग; रुग्णांची सुरक्षित सुटका, बचावकार्य युद्धपातळीवर!
Leave a Comment
