नगरसेवक केतन शेट्ये यांच्या वाढदिवसानिमित्त ४०० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

Shabbir Vasta
2 Min Read

रत्नागिरी (प्रतिनिधी):
रत्नागिरीतील कोकणनगर वॉर्ड क्रमांक ४ चे लोकप्रिय युवा नगरसेवक केतन उमेश शेट्ये यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, सामाजिक बांधिलकी जपत कोकणनगरमध्ये भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महापुरुष मित्र मंडळ आणि माजी नगरसेविका कौसल्या केतन शेट्ये यांच्या पुढाकाराने झालेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
     कोकणनगर येथील महात्मा गांधी शाळा क्रमांक २१ मध्ये पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन नगरसेविका फौजीया तनवीर मुजावर व माजी नगरसेविका कौसल्या केतन शेट्ये यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या फौजीया मुजावर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला, तर उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी लाडक्या नगरसेवकांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
     या शिबिरात जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी आणि इन्फिगो आय हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली. सुमारे ४०० हून अधिक नागरिकांनी या संधीचा लाभ घेतला. शिबिरात मधुमेह (शुगर), रक्तदाब (BP), कॅन्सर, हाडांचे विकार व डोळ्यांची तपासणी,कोलेस्ट्रॉल, थायरॉईड, किडनी आणि लिव्हर प्रोफाइल,आजारांचे वेळेत निदान आणि प्रतिबंधात्मक उपाय तपासण्या करण्यात आल्या:
       महापुरुष मित्र मंडळाची भूमिका मांडताना विशाल कदम यांनी सांगितले की, हे मंडळ गेल्या ३५ वर्षांपासून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून कार्यरत आहे. “आमचे आधारस्तंभ माजी नगराध्यक्ष स्व. उमेश शेट्ये यांच्या स्मृतींना उजाळा देत आम्ही कोणताही भेदभाव न ठेवता शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करत असतो. आजचे आरोग्य शिबिर हा त्याच सामाजिक ऋणाची परतफेड करण्याचा एक प्रयत्न आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
    हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महापुरुष मित्र मंडळ (कोकणनगर) आणि समता मित्र मंडळ (कीर्तीनगर) येथील महिला, पुरुष व युवक कार्यकर्त्यांनी विशेष कष्ट घेतले. आयोजकांच्या वतीने जिल्हा रुग्णालय आणि इन्फिगो आय हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांचे व कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले.
      नगरसेवक केतन शेट्ये यांच्या वाढदिवसाचा हा विधायक उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला असून, यामुळे सामाजिक आरोग्याप्रती नवी जागृती निर्माण झाली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *