देवगड:
कोकणचा राजा आणि फळांचा सम्राट मानल्या जाणाऱ्या हापूस आंब्यावर यावर्षी निसर्गाने वक्रदृष्टी फिरवली आहे. देवगड तालुक्यात यंदा मोहोराचा सडा पडला खरा, पण बदलत्या हवामानाने या मोहोराचे रूपांतर सोन्यात होण्याऐवजी कोळशात झाले आहे. मोहराचे रूपांतर फळधारणेत न होता तो करपून काळा पडल्याने बागायतदारांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
या भीषण परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त पथकाने देवगड तालुक्यातील बाधित बागांची ‘क्षेत्रीय पाहणी’ करून शेतकऱ्यांना धीर दिला.
तापमानाचा लपंडाव आणि ‘वांझ’ मोहोराचा विळखा
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीम. भाग्यश्री नाईकनवरे आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वैभव शिंदे यांनी मिठबाव, कातवण, कुणकेश्वर आणि इळये या भागांतील बागांची पाहणी केली. जानेवारीच्या उत्तरार्धात तापमानात अचानक झालेली घट हापूस साठी घातक ठरली.
मुख्य अडथळे:
* परागीभवन ठप्प: कडाक्याच्या थंडीमुळे परागीभवन प्रक्रियेत अडथळे आले.
* वांझ मोहोर: मोहोरामध्ये ‘संयुक्त फुलांचे’ प्रमाण घटल्याने मोहोर असूनही फळधारणा झाली नाही.
* फळगळ: जिथे फळे लागली होती, तिथेही सुपारीच्या आकाराची फळे गळून पडत असल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत.
संकटावर मात करण्यासाठी तज्ज्ञांचा ‘गुरुमंत्र’
बागायतदारांनी खचून न जाता बागेचे शास्त्रोक्त व्यवस्थापन केल्यास परिस्थिती सुधारू शकते, असा विश्वास पथकाने व्यक्त केला आहे. तज्ज्ञांनी खालील उपाय सुचवले आहेत:
* स्वच्छता: नवीन पालवी आणि मोहोरासाठी झाडावरील जुने, करपलेले मोहोराचे दांडे कापून टाकावेत.
* पोषण: मोहोराची गुणवत्ता सुधारण्यासाठी ०:५२:३४ + बोरॉन (२०%) ची फवारणी करावी.
* फळधारणा: फळे धरल्यानंतर १३:००:४५ आणि प्लॅनोफिक्सचा योग्य वापर करावा.
* पाणी व्यवस्थापन: झाडाला १५ दिवसांतून एकदा १५० ते २०० लिटर पाणी द्यावे आणि ओलावा टिकवण्यासाठी झाडाच्या बुंध्याशी गवताचे आच्छादन (Mulching) करावे.
* धुरीकरण: हवामानाचा ताण कमी करण्यासाठी संध्याकाळी बागेत काडीकचरा पेटवून हलका धूर करावा.
* संरक्षण: तुडतुडे आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिफारशीत कीटकनाशकांचा वापर करावा.
तिसऱ्या बहरावर आशा टिकून!
सध्या काही भागांत तिसऱ्या टप्प्यातील मोहोर येत आहे. जर आगामी काळात निसर्गाची साथ लाभली आणि हवामान स्थिर राहिले, तर काही प्रमाणात उत्पादन हाती लागण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. ‘राजा’ वाचवण्यासाठी आता बळीराजाला अधिक कष्टाची आणि योग्य नियोजनाची जोड द्यावी लागणार आहे.
हापूसवर निसर्गाचा घाला! देवगडचा ‘राजा’ संकटात; बागायतदारांच्या डोळ्यांत पाणी
Leave a Comment
