रत्नागिरी (शिरगाव):
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, रत्नागिरी-१ अंतर्गत कोतवडे-१ बिटमधील शिरगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आज सामूहिक ‘पोषण पखवाडा’ आणि ‘बाळजत्रा’ कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. शिरगाव गांजुर्डा अंगणवाडीत पार पडलेल्या या कार्यक्रमात बालकांच्या आरोग्य आणि पोषण आहारविषयक जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये:
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका ममता गावडे यांनी केले, तर प्रास्ताविकातून पर्यवेक्षिका मंजिरी पवार यांनी पोषण पखवाडा व बाळजत्रेचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन:
या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या सौ. श्रद्धा दीपक मोरे, पंचायत समिती सदस्या सौ. साक्षी परेश कुमठेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी चव्हाण सर, पर्यवेक्षिका मंजिरी पवार, आरबीएसकेच्या डॉ. स्वाती पाटील, ग्रामविकास अधिकारी उल्हास कोळी, उपसरपंच मिलिंद बाणे, तसेच ग्रामपंचायत सदस्य, आरबीएसके टीम, बचत गटाच्या प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
आरोग्य आणि पोषण: प्रकल्प अधिकारी चव्हाण सर यांनी बालकांच्या सर्वांगीण विकासात आहाराचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. स्वाती पाटील यांनी ० ते १८ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, उपचार आणि सकस आहाराविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
पालकांचा सहभाग: यावेळी पालकांनी बालकांच्या आरोग्यासाठी पोषक घटकांपासून बनवलेल्या विविध रेसिपींचे प्रदर्शन भरवण्यात आले होते, ज्याचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
खेळ जत्रा: अंगणवाडी सेविकांनी मुलांसाठी विविध खेळांचे नियोजन केले होते, ज्याचा बालकांनी मनसोक्त आनंद लुटला.
सहकार्याची भावना:
ग्रामविकास अधिकारी उल्हास कोळी यांनी शिरगाव कार्यक्षेत्रात अशा प्रकारचे उपक्रम नियमित राबवल्याबद्दल समाधान व्यक्त करत, ग्रामपंचायतीकडून सदैव सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. शेवटी, पर्यवेक्षिका मंजिरी पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि नियोजन करणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे कौतुक केले.

