मुंबई :
राज्यातील शाळा सुरू होण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके अजूनही तयार झालेली नाहीत, हे धक्कादायक वास्तव आता समोर आले आहे. प्रशासनाच्या कामकाजातील दिरंगाईमुळे यंदा इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकांच्या छपाईला मोठा विलंब झाला आहे. यामुळे नवीन अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकांची निर्मिती प्रक्रिया कमालीची लांबली असून, १५ जूनपासून शाळा सुरू होत असल्या तरी सहावीच्या विद्यार्थ्यांना वेळेवर पुस्तके मिळणार का, याबाबत तीव्र शाशंकता निर्माण झाली आहे. सर्व माध्यमांची ही सर्व पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पडण्यासाठी थेट जूनअखेर उजाडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात शालेय अभ्यासक्रमात नवीन बदल झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने ‘बालभारती’मार्फत पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली जाते. परंतु, बालभारतीच्या संपूर्ण कारकिर्दीत यंदा प्रथमच एकाच वर्षात तब्बल चार इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने तयार करून आणली जात आहेत. या मोठ्या बदलाचा ताण निर्मिती प्रक्रियेवर पडल्याचे दिसून येत आहे.
पाठ्यपुस्तकांच्या निर्मिती प्रक्रियेत अभ्यासक्रमाला मंजुरी मिळणे, विविध पातळीवर होणारे गुणवत्ता परीक्षण आणि अंतिम मान्यता मिळणे या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रशासकीय पातळीवर मोठा विलंब झाला. परिणामी, प्रत्यक्ष छपाईचे काम खूप उशिराने सुरू होऊ शकले. त्यामुळे यंदा नियत वेळेत आणि नियमितपणे शाळा सुरू झाल्या, तरी संबंधित इयत्तांचे वर्ग सुरुवातीला पाठ्यपुस्तकांशिवायच भरवावे लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पुस्तकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे.
शाळा सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक; पाठ्यपुस्तके अद्याप तयार नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
Leave a Comment
